आदिपुरुष (Adipurush) हा रामायण महाकाव्यावर आधारित एक सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले होते. दिग्दर्शनासह त्यांनी या सिनेमाची पटकथा देखील लिहिली होती. या चित्रपटाचे संवाद मनोज मुंतशिर यांनी लिहिले आहेत. टी-सीरीज आणि रेट्रोफिल्स यांनी मिळून आदिपुरुष सिनेमाची निर्मिती केली आहे.
अजय-अतुल या संगीतकार जोडीने आदिपुरुषच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली होती. या चित्रपटामध्ये प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान, सनी सिंग आणि देवदत्त नागे हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये चित्रपटाची घोषणा करण्यात आली. प्रभास प्रभू रामचंद्राच्या भूमिकेमध्ये दिसणार या घोषणेने एकूण सर्व चित्रपट चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या. या चित्रपटावर एकूण ५०० ते ७०० कोटी रुपये इतका खर्च झाला आहे अशा माहितीमुळे चाहत्यांना चित्रपटाकडून फार अपेक्षा होत्या. पुढे चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला. यासाठी अयोद्धा नगरीमध्ये खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पण प्रभासचा लूक आणि एकूणच वाईट व्हीएफएक्समुळे कोणालाच टीझर फारसा आवडला नाही.
पुढे म्युझिक लॉन्चच्या वेळी अजय-अतुलच्या संगीतामुळे हा सिनेमा हिट होणार असे काहीजणांना वाटले. पण चित्रपटाचा मुख्य ट्रेलर लॉन्च केल्यानंतर सर्वांची निराशा झाली. एकूणच सर्व कलाकार, दिग्दर्शक, निर्माते सर्वांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. सोशल मीडियावर ट्रोलिंग पाहता सिनेमामध्ये बदल करण्यासाठी निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. पण असे करुनही व्हीएफएक्ससह अन्य तांत्रिक बाबींमध्ये त्यांनी फारशी मेहनत न घेतल्याची तक्रार प्रेक्षकांनी केली. पुढे सिनेमा प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच संवादांसह विविध सीन्सवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला. सुरुवातीला फक्त सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग वाढायला लागलं. हा चित्रपट तयार करुन निर्मात्यांनी विशेषत दिग्दर्शक ओम राऊत आणि संवाद लेखक मनोज मुंतशिर यांनी हिंदू देवतांचा अपमान केला आहे असे लोक म्हणू लागले.
ठिकठिकाणी वाद पेटला. फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरुनही चित्रपटाला विरोधाला सामोरे जावे लागले. परिस्थिती पाहता निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या मागणीनुसार संवाद बदलले, काही दृष्ये चित्रपटातून काढून टाकली. फक्त प्रेक्षकांनीच नाही तर समीक्षकांनीही आदिपुरुषवर टिका केली. हा प्रभाससाठी फार वाईट काळ ठरला. बाहुबलीनंतर त्याचे सलग २ चित्रपट फ्लॉप झाले होते. बाहुबलीमुळे तयार झालेली त्याची भव्य प्रतिमा आदिपुरुषमुळे प्रचंड खराब झाली.