अजय जडेजा News
अजय जडेजा (Ajay Jadeja) हे माजी भारतीय क्रिकेटपटू आहेत. त्यांचे संपूर्ण नाव अजयसिंगजी दौलतसिंगजी जडेजा असे आहे. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९७१ रोजी जामनगर, गुजरात येथे एका राजपुत कुटूंबात झाला. त्यांचे वडील दौलतसिंगजी जडेजा हे जामनगर लोकसभा मतदारसंघातून ३ वेळा निवडून आले होते. त्यांच्या राजघराण्यात अनेक नावाजलेले क्रिकेटपटू होऊन गेले आहेत. त्यामध्ये के.एस.रणजित सिंग (ज्यांच्या नावावरुन रणजी करंडक आहे) आणि के.एस.दुलीप सिंग (ज्यांच्या नावावरुन दुलीप करंडक आहे) आहेत. अशा दिग्गज क्रिकेटपटूंचा वारसा लाभलेले अजय जडेजा यांचे शिक्षण नवी दिल्ली येथे झाले. त्यांना बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवण्यात आले होते. त्या परिस्थिती राहणे पसंत नसल्याने ते अनेकदा स्कूलमधून पळून गेले होते. शेवटी नवी दिल्लीमधील सरदार पटेल विद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी तेथील हिंदू कॉलेजमधून पदवी मिळवली. तेव्हा त्यांची ओळख आदिती जेटलीशी झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊन त्यांनी लग्न केले.
१९८८ पासून अजय जडेजा हे देशपातळीवरील क्रिकेट स्पर्धांमध्ये सक्रिय होते. १३ नोव्हेंबर १९९२ रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत या कसोटी सामन्यात त्यांना खेळण्याची संधी देण्यात आली. त्याच वर्षी त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्येही पदार्पण केले होते. ते १९९२ ते २००० या काळात भारतीय संघात होते. त्यांना १५ कसोटी सामने आणि १९६ एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. या काळात ते भारतीय संघातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक होते. ते फलंदाजी आणि गोलंदाजीही उत्तमरित्या करत. दरम्यानच्या काळात मॅच फिक्सिंग प्रकरणामध्ये अजय जडेजा हे नाव आले. आरोप सिद्ध झाल्याने त्यांच्यावर ५ वर्षांची बंदी घालण्यात आली. २००१ मध्ये के. माधवन समितीच्या शिफारशींच्या आधारे पाच वर्षांची बंदी घालण्याच्या बीसीसीआयच्या आदेशाला आव्हान देत त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. पुढे २००३ मध्ये ही बंदी दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केली. २००३ मध्ये त्यांना रणजी खेळण्याची संधी मिळाली.
काही वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर त्यांनी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी समालोचक आणि प्रशिक्षक म्हणून दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली. २०१५ मध्ये अजय यांची दिल्लीच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली. पण काही कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला. २०२३ मध्ये त्यांची नियुक्ती अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून करण्यात आली. त्यांच्या प्रशिक्षणाखाली हा संघ उत्तम कामगिरी करत असल्याचे दिसून येते.
Read More