अमोल रामसिंग कोल्हे हे प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी आहेत. त्यांचा जन्म १८ सप्टेंबर १९८० मध्ये नारायणगाव येथे झाला. ते पेशाने डॉक्टर आहेत. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्यात काही काळ डॉक्टरमधून काम केलं. त्यानंतर ते अभिनय क्षेत्राकडे वळले. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून ते घराघरात पोहोचले. अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवल्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला.
अमोल कोल्हे यांनी शिवसेना पक्षातून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. २०१४ साली त्यांनी शिवसेना या पक्षात प्रवेश केला. मात्र, २०१९ साली त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिरुर मतदारसंघातून शिवसेनेच्या आढळराव पाटील यांचा पराभव करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
२०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातून जे चार खासदार निवडून आले, त्यामध्ये अमोल कोल्हे यांचाही समावेश होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ( शरद पवार गट ) त्यांना पुन्हा शिरूर मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीतही त्यांचा विजय झाला. अमोल कोल्हे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट) विद्यमान खासदार आहेत.