अनिल अंबानी (Anil Ambani) हे एक भारतीय व्यावसायिक आहेत. अनिल हे धीरूभाई अंबानी यांचा धाकटा मुलगा आणि मुकेश अंबानी यांचा धाकटा भाऊ आहे. अनिल अंबानी यांचा जन्म ४ जून १९५९ रोजी झाला. हे भारतीय उद्योगपती रिलायन्स ग्रुपचे (ऊर्फ रिलायन्स एडीए ग्रुप) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या विलगीकरणानंतर जुलै २००६ मध्ये रिलायन्स समूहाची निर्मिती करण्यात आली. रिलायन्स कॅपिटल आणि रिलायन्स पॉवरसह अनेक स्टॉक्स लिस्टेड कॉर्पोरेशन्सचे मालकही आहेत. अनिल अंबानी हे एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते, पण आता ते श्रीमंतांच्या यादीपासून कोसो दूर गेले आहेत. रिपोर्ट्सनुसार, २००७ मध्ये अनिल अंबानी यांच्याकडे ४५ बिलियन डॉलर्सची संपत्ती होती. एवढेच नाही तर २००८ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते सहाव्या स्थानावर होते. २००२ मध्ये धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात विभागला गेला होता. मुकेश अंबानी यांना पेट्रोकेमिकल, टेक्सटाईल आणि रिफायनरी; तर अनिल यांना टेलिकॉम, फायनान्स आणि एनर्जीचा व्यवसाय मिळाला. वाटणीच्या वेळी अनिल अंबानींची स्थिती मजबूत मानली जात होती, कारण त्यांच्याकडे नव्या काळातील व्यवसाय होता. मात्र, असे असूनही ते यात विशेष काही करू शकले नाहीत आणि आज त्यांच्या कंपन्यांना दिवाळखोरीचा सामना करावा लागत आहे.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इनोव्हेंचर्स कंपनीला NCLT मध्ये आणून दिवाळखोरीची कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकन फायनान्सर जेसी फ्लॉवर यांनी अनिल अंबानी यांच्या कंपनीला कर्जाची परतफेड न केल्यामुळे एनसीएलटीमध्ये ओढले आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अमेरिकास्थित फायनान्सरकडे येस बँकेने ४८,००० कोटी रुपयांचे बुडीत कर्ज हस्तांतरित केले होते, ज्यामध्ये अनिल अंबानींच्या कर्जाचाही समावेश होता.
अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलची उपकंपनी असलेल्या रिलायन्स जनरल इन्शुरन्सला जीएसटी इंटेलिजन्स डायरेक्टरेट जनरल (DGGI) ने ९२२.५८ कोटी रुपयांच्या कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या आहेत. डीजीजीआयने कंपनीला नोटीस पाठवून कोट्यवधींच्या उत्पन्नावर जीएसटीची मागणी केली आहे. अनिल अंबानी संदर्भात सर्व बातम्या तुम्ही या सदरामध्ये वाचू शकता.