असदुद्दीन ओवेसी News
असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (AIMIM) या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १३ मे १९६९ रोजी आंध्र प्रदेशातील हैदराबाद (आता तेलंगणा) याठिकाणी झाला. हैद्राबाद मतदारसंघातून सलग पाचवेळा ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. असदुद्दीन ओवेसी यांनी १९९४ साली सर्वप्रथम चारमीनार विधानसभा मतदारसंघातून आंध्रप्रदेश विधानसभेत प्रवेश केला होता. ओवेसी यांनी निजाम महाविद्यालयातून (उस्मानिया विद्यापीठ) कला शाखेचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी लंडनमधील ‘लिंकन्स इन’ (Lincoln’s Inn) मधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या वक्तृत्व आणि संघटन कौशल्याच्या बळावर तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि इतर राज्यातही पक्षाचा विस्तार केला आहे. भारतातील मुस्लीम समाजाचे आपणच प्रतिनिधित्व करत आहोत, असा त्यांचा दावा आहे. मात्र २०२४ च्या निवडणुकीत ओवेसी वगळता त्यांचे इतर उमेदवार निवडून आलेले नाहीत. महाराष्ट्रातील औरंगाबाद लोकसभेची जागा यावेळी त्यांना गमवावी लागली.
अनेक राज्यातील विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुस्लीमबहुल मतदारसंघात असदुद्दीन ओवेसी आपल्या पक्षाचे उमेदवार देत असतात. मुस्लीम समाजाला एक राजकीय पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ओवेसी करत आहेत. अल्पसंख्याकांची मते घेणाऱ्या काँग्रेस पक्षावर ओवेसी वेळोवेळी टीका करत असतात. काँग्रेस अल्पसंख्याकांची मते घेऊन त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप ते करतात. त्यामुळेच त्यांच्यावर भाजपाची बी टीम असल्याचा आरोप काँग्रेस आणि इतर पक्ष करत असतात.
अठराव्या लोकसभेत खासदारकीची शपथ घेत असताना ओवेसी यांनी ‘जय पॅलेस्टाईन’ अशी घोषणा दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर भाजपा आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली. पॅलेस्टाईनबाबत केंद्र सरकारने भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी अनेकदा केली आहे.
Read More