केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्रात २८८ जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. तर झारखंडमध्ये दोन टप्प्यांत १३ आणि २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांत २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.
महाराष्ट्रात सत्तारूढ महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये मुख्य लढत होणार आहे. तर मनसे, वंचित बुहजन आघाडी आणि अपक्षही रिंगणात आहेत. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत असून त्याच्या अवघे तीन दिवस आधी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. २०१९ मध्ये भाजपा-शिवसेना युतीने तर विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर शिवसेना महायुतीतून वेगळी झाली.
तर दुसरीकडे झारखंडमधील विधानसभेच्या ८१ जागांसाठी १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. दोन्ही राज्यातील निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. झारखंडमध्ये मागच्या वेळेस पाच टप्प्यांत निवडणूक झाली होती. २०१९ साली झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) पक्षाला ४७ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपाला २५ जागांवर समाधान मानावे लागले होते.