बॅंक ही आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी मदत करणारी संस्था आहे. बॅंकेद्वारे खाते उघडण्यापासून ते ऑनलाइन बॅंकींगपर्यंत सर्व प्रकारच्या सुविधा ग्राहकांना देण्यात येतात. स्वत:चा व्यवसाय असणाऱ्या व्यावसायिकांना व्यवहार करताना बॅंकेची मदत होते. कर्ज काढण्यासाठीही बॅंक योग्य पर्याय समजला जातो. युरोप खंडामध्ये बॅंक संकल्पना उदयास आली. भारतामध्ये मौर्य काळामध्ये बॅंकांप्रमाणे एक प्रणाली आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरली जात होती असे म्हटले जाते. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीनंतर बॅंक या संस्थेला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली. भारत पारतंत्र्यामध्ये असताना ब्रिटीशांद्वारे देशामध्ये ही संकल्पना पोहचवली गेली. १७७० मध्ये भारतामधील पहिली बॅंक ‘बँक ऑफ हिंदुस्तान’ ही सुरु झाली. पुढे काही वर्षांनी १८२६ मध्ये ती बंद पडली. जून १८०६ मध्ये कोलकातामध्ये ‘बॅंक ऑफ कलकत्ता’ची स्थापना करण्यात आली. पुढे १८०९ मध्ये तिचे नाव बदलून ‘बॅंक ऑफ बंगाल’ करण्यात आले. तेव्हा ब्रिटीशाच्या राजवटीमध्ये असलेल्या भारताचे बॉम्बे, मद्रास आणि बंगाल या तीन प्रांतांमध्ये विभाजन करण्यात आले होते. यातील बंगाल प्रांतामध्ये ‘बॅंक ऑफ बंगाल’ ही बॅंक प्रस्थापित करण्यात ब्रिटीशांना यश आले होते. त्यांनी १८४० मध्ये ‘बँक ऑफ बॉम्बे’ आणि १८४३ मध्ये ‘बँक ऑफ मद्रास’ या दोन बॅंकाची स्थापना केली. व्यवहार सोप्पा व्हावा यासाठी १९२१ मध्ये तिन्ही प्रांतांमधील बॅंका एकत्र करुन ‘इम्पीरियल बँक ऑफ इंडिया’ या संस्थेची निर्मिती करण्यात आली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५५ मध्ये ‘इम्पीरियल बँक ऑफ इंडिया’चे नाव बदलून ‘स्टेट बॅंक ऑफ इंडिया’ असे ठेवण्यात आले. भारतामध्ये सध्या एसबीआयसह असंख्य बॅंका सुरु आहेत. Read More