
शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) आक्रमक नेते अशी ओळख असलेल्या आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी १९८२ साली आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली. १९९२ मध्ये ते रत्नागिरी जिल्हापरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. १९९५ आणि १९९९ साली दोनवेळा ते चिपळूणमधून शिवसेनेकडून विधानसभेवर निवडून गेले. २००४ साली शिवसेनेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत अपक्ष निवडणूक लढली. पण, त्यांना पराभवाचा सामना पत्करावा लागला. त्यानंतर जाधवांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.
२००९ साली रामदास कदम यांचा पराभव करत पुन्हा जाधव विधानसभेवर निवडून गेले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्रिमंडळात विविध खात्याची मंत्रिपद त्यांनी संभाळली. त्यानंतर अंतर्गत वादामुळे ते राष्ट्रवादी सोडून पुन्हा शिवसेनेत आले. शिवसेना फुटीनंतर भास्कर जाधव यांच्यावर नेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता ते गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.