काँग्रेस Videos
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (INC) २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राज्याच्या काळात झाली होती. एलेन ऑक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळात या पक्षाचे नेतृत्व मवाळ गटाकडे होते. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत तिचे नेतृत्व जहाल गटाकडे होते. त्यानंतर १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे (Congress) नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान आहे. या पक्षाने स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर देशाच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावली आहे. काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह या देशात आहे. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंह या काँग्रेस नेत्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. तर डॉ. राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले आहे.
सध्या मल्लिकार्जुन खरगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आहे. २०२२ पासून ते काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. त्यांच्या अगोदर सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाताळत होत्या.
२०१४ मध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपा प्रणित लोकशाही आघाडीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जोरदार पराभव केला. काँग्रेस प्रणित सयुक्त पुरोगामी आघाडीचे केवळ ५९ सदस्य निवडून आले होते. यात एकट्या काँग्रेस पक्षाला केवळ ४४ जागांवर विजय मिळाला. तर, भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३३६ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. २०१९ मध्येही काँग्रेसला शंभरचा आकडा गाठता आलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीला केवळ ९१ जागांवरच विजय मिळवता आला. यात काँग्रेसचा वाटा ५२ इतका होता. पक्षात प्रभावी नेतृत्वाचा अभाव, अकार्यक्षमता आणि नेत्यांची गळती ही कारणे पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवली. यात २०१९ आणि २०१४ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्यात तिला यश आले.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. यात काँग्रेसचा वाटा ९९ इतका आहे. इंडिया आघाडीला बहुमताचा २७२ चा आकडा गाठता आला नाही. भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळाली. परंतु, काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या माध्यमातून संसदेत विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा आणि भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्यात काँग्रेसला आलेले यश हे सर्व या विजयाचे परिपाक असल्याचे मानले जाते.
Read More