
क्रिकेट (Cricket) हा भारतासह जगभरातील लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. १३०० च्या आसपास युरोपमध्ये क्रिकेटचा उदय झाला असे म्हटले जाते. पण याला पुरावा नसल्याने तसे म्हणता येणार नाही. सोळाव्या शतकात इंग्लंडच्या काही भागांमध्ये क्रिकेट खेळले जात होते असे पुरावे प्राप्त झाल्याने बहुतांश लोक तेव्हा हा खेळ प्रचलित झाला असे मानतात.
क्रिकेट हा मुळात लहान मुलांचा खेळ आहे असे पूर्वी मानले जात असे. त्यानंतर प्रौढांनी देखील क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अठराव्या शतकापर्यंत क्रिकेटचा व्याप वाढला. तेव्हा क्रिकेटमध्ये अनेक नियम बदलले गेले. त्या काळात इंग्लंड व अन्य युरोपियन देशांमध्ये क्रिकेट खेळाला प्रसिद्धी मिळाली होती.