देवेंद्र फडणवीस Videos
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ५ डिसेंबर २०२४ ला मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे २०१४ ते २०१९ पर्यंत महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि वयाच्या ४४ व्या वर्षी ते राज्याचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी झाला. त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. तसेच डहलम स्कूल ऑफ एज्युकेशनमधून बिझनेस मॅनेजमेंट आणि डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते १९९८ मध्ये जर्मनीला गेले होते. २००६ मध्ये त्यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याशी लग्न केले आणि त्यांना
दिविजा नावाची एक मुलगी आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपली राजकीय कारकीर्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून (RSS) सुरू केली आणि १९९० च्या दशकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मध्ये सामील झाले. त्यांनी नागपूरच्या राम नगर प्रभागातून त्यांची पहिली महापालिका निवडणूक जिंकली आणि १९९२ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९७ मध्ये, ते नागपूर महानगरपालिकेचे सर्वात तरुण महापौर आणि भारतातील दुसरे सर्वात तरुण महापौर बनले. १९९९ पासून ते २००४ पर्यंत सलग तीन वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.
२०१९ साली त्यांनी ‘पुन्हा येईन’ अशी घोषणा देत भाजपाचे १०५ आमदार निवडून आणले. पण शिवसेनेने निकालानंतर युती तोडल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबर त्यांनी अचानक मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण बहुमत सिद्ध करण्यात अडचणी दिसत असल्यामुळे तीनच दिवसात त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे २०२२ साली शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांना बाजूला करून शिवसेनेवरच हक्क सांगितला. एकनाथ शिंदेंबरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन केले. तसेच २०२३ मध्ये राष्ट्रवादीतून अजित पवारांना वेगळे करण्यातही त्यांनी यश मिळविले. मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो, असे विधान त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान केले होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे १३२ आमदार निवडून आणण्याची किमया देवेंद्र फडणवीस यांनी साधली आहे. सलग तीनवेळा भाजपाचे १०० हून अधिक आमदार निवडून आणण्याचा रेकॉर्ड देवेंद्र फडणवीस यांच्या नावे नोंदवला गेला आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. मात्र भाजपाला २०१९ मध्ये असलेल्या २३ जागा पुन्हा जिंकून आणण्यात अपयश आले. २८ जागा लढणाऱ्या भाजपाला केवळ ९ जागा मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदावरून मुक्त करण्याची विनंती दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे केली. मात्र पक्षाने त्यांची मागणी फेटाळून लावत विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्यावरच विश्वास असल्याचे दाखवून दिले.
Read More