दसरा २०२४ News
‘दसरा’ किंवा ‘विजयदशमी’ (Dussehra) हा हिंदू धर्मातील महत्त्वपूर्ण सण आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात. दसरा हा या शुभ मुहूर्तांपैकी एक आहे असे मानले जाते. यामुळे दसऱ्याच्या दिवशी कोणतेही काम करायला सुरुवात केली तर ते काम पूर्ण होते अशी अनेकांची आस्था आहे. यामुळे पूर्वीच्या काळी दसऱ्याच्या दिवशी राजे-महाराजे आपल्या सैन्यासह लढाई करण्यास निघत असत असेही म्हटले जाते. क्षत्रियांप्रमाणे व्यापारी मंडळीही याच दिवशी व्यापारासाठी बाहेर पडत, गावची सीमा ओलांडत असत. गावाची, नगराची सीमा ओलांडण्याच्या याच कृतीवर दसऱ्याशी निगडीत “सीमोल्लंघन करणे” ही म्हण प्रचलित झाली असा अंदाज लावला जातो. मुळात सीमोल्लंघन करणे म्हणजे जुन्या गोष्टी सोडून नव्या ध्येयासाठी पुढे जाणे होय.
दसऱ्याला (Dasara)काहीजण विजयदशमी असेही म्हणतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दैत्य महिषासुर आणि दुर्गा यांच्यामध्ये युद्ध सुरु होते. या युद्धाचा शेवट दसराच्या दिवशी झाला. अश्विन दशमीच्या दिवशी विजय मिळाल्यामुळेही या दिवसाला ‘विजयादशमी’ म्हणत असावेत असे असू शकते. दसऱ्याशी अन्य पौराणिक गोष्टीही संबंधित आहेत. भगवान श्रीराम यांनी राक्षसांचा राजा रावण यांचा वध दसऱ्याला केला होता. यामुळेच दसऱ्याला रावणवध देखील साजरा केला जातो. भारतात त्यातही उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये दसऱ्याला रावणाचे मोठ्ठाले पुतळे तयार करुन ते जाळले जातात. या पुतळ्यांसह आपल्या सर्वांच्या आत असलेली नकारात्मक शक्तीही नाहीशी होवो असा विचार दडलेला आहे असे म्हटले जाते.
दसऱ्याच्या दिवशी पांडव अज्ञातवासातून बाहेर पडले म्हणजेच त्यांनी सीमोल्लंघन केले. अज्ञातवासात जाण्यापूर्वी त्यांनी आपल्याला कोणी ओळखू नये यासाठी म्हणून आपापली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवली होती. दसऱ्याला सर्व पांडवांनी ती शस्त्रे बाहेर काढून त्या पाचही भावंडांनी शस्त्रांची पूजा केली. यामुळेच आपल्याकडे विजयादशमीच्या, दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरातील मौल्यवान वस्तूंची पूजा केली जाते. पूजा करताना सरस्वती मातेचे आवाहन देखील केले जाते. महाराष्ट्रामध्ये दसऱ्याला आपट्याची पाने एकमेकांना देत शुभेच्छा दिल्या जातात.
Read More