शिवसेने (एकनाथ शिंदे गट)चे आमदार आणि जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)हे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन त्यांनी शिवसेनेचे (Shivsena) काम सुरू केले आणि एका पानटपरी चालकापासून ते तीनदा मंत्री झाले आहेत. शिवसेनेची खानदेशातील मुलुखमैदानी तोफ म्हणूनही त्यांचा शिंदे गटात सामील होण्याआधीपर्यंत उल्लेख केला जात असे.
गुलाबराव १९९९ मध्ये एरंडोल मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. ते सलग दोन वेळा निवडून गेले. यानंतर २०१४ मध्ये ते तिसऱ्यांदा विधानसभेत पोहचले. भाजपा-सेना मंत्रिमंडळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांना सहकार राज्यमंत्री केले. त्यांच्याकडे परभणीच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी सोपवली. २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा ते विजयी झाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जळगावच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही त्यांच्यावर टाकण्यात आली. त्यानंतर, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील सरकारमध्ये त्यांच्याकडे पाणीपुरवठा खातं आहे.