
१९७५ मध्ये विश्वचषक स्पर्धेची सुरुवात झाली. त्या सुमारास क्रिकेटला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली होती असे मानले जाते. विश्वचषक स्पर्धेमुळे क्रिकेटच्या लोकप्रियता वाढत गेली. तो काळ वेस्ट इंडिजच्या संघाने गाजवला. कालांतराने क्रिकेट विश्वामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपला दबदबा निर्माण केला होता. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासामध्ये ऑस्ट्रेलियाने अनोखा विक्रम केला आहे. या संघाने सलग ५ वेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. तसेच त्यांनी टी-२० विश्वचषकावरही आपले नाव कोरले आहे. २०२३ मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही त्यांनी भारताचा पराभव केला होता. फार आधीपासून ऑस्ट्रेलिया हा भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी मानला जातो. ऑस्ट्रेलियालाही भारत नेहमी आव्हान देत असतो.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia)यांच्यामध्ये वैर नसले तरी ते क्रिकेटच्या सामन्यामध्ये नेहमी दुसऱ्यावर वरचढ राहण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या २०२३ विश्वचषक सुरु आहे. या स्पर्धेमध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होता. या सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. हे दोन्ही संघ १३ वेळा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये आमने-सामने आले आहेत. त्यात ऑस्ट्रेलियाला ८ वेळा यश मिळाले आहे. तर भारताने ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय फॉरमॅटच्या १४९ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने ८३ सामने जिंकले आहेत. तर भारताने ५६ सामन्यात बाजी मारली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चढाओढ खऱ्या अर्थाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या गाबा कसोटीमध्ये पाहायला मिळाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी मिळून १०७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील ४५ सामने ऑस्ट्रेलियाने, तर ३२ सामने भारताने जिंकले आहेत. तसेच २९ सामने अनिर्णीत राहिले आहेत.