
शिवशंकराच्या भक्तासाठी, शैव परंपरेतील अनुयायांसाठी महाशिवरात्र (Maha Shivratri) हा सण खूप महत्त्वपूर्ण असतो. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. पण माघ महिन्यातील महाशिवरात्रीची माघ कृष्ण चतुर्दशी तिथी खास असते, या तिथीला महादेवांनी तांडव नृत्य केले होते अशी आख्यायिका आहे. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो. या सणाला भक्तगण उपवास करतात आणि रात्रभर शंकराची आराधना करतात. पुढे दुसऱ्या दिवशी पूजा करुन मग उपवास सोडतात.
या तिथीला पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केला जातो. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताचा लेप शिवलिंगावर लावतात. त्यासह धोत्रा, बेलाची पानेही वाहिली जातात. काही ठिकाणी प्रसाद म्हणून भांगचे सेवन केले जाते. २०२५ मध्ये हा सण २६ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे.