
महायुतीची (Mahayuti) स्थापना २०१४ मध्ये झाली होती. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुती स्थापन झाली. २०२२ साली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि २०२३ साली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांचा महायुतीत समावेश झाला. या तीन प्रमुख पक्षांसह भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) जनसुराज्य शक्ति पक्ष, युवा स्वाभिमान पार्टी या लहान पक्षांचादेखील महायुतीमध्ये समावेश आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अगदी तोंडावर राष्ट्रीय समाज पक्षाने (रासप) महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी विधानसभा स्वबळावर लढण्याची घोषणा केली. जानकर हे २०२४ लोकसभा निवडणूकीपूर्वी महायुतीमध्ये सहभागी झाले होते.
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महायुतीमधील तीन पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली. पण त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही. ४८ मतदारसंघांपैकी ३० जागा महाविकास आघाडीने जिंकल्या, तर महायुतीला केवळ १७ जागा जिंकता आल्या. तर एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली.