मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नेते असून ते मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. मनोज जरांगे यांचा जन्म १ ऑगस्ट १९८२ रोजी बीड जिल्ह्यातील मारोती या गावात झाला. मात्र, काही वर्षांपूर्वी ते जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये स्थायिक झाले. मनोज जरांगे पाटील यांना पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडिल असा परिवार आहे. ते पूर्णवेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करतात. मनोज जरांगे यांचे शिक्षण १२वी पर्यंत झाले आहे.
मनोज जरांगे यांनी काही वर्षांपूर्वी शिवबा या संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेमार्फत त्यांनी मराठा आरक्षणासाठी गावागावात विविध आंदोलने केली. मनोज जरांगे यांनी २०१२मध्ये ला शहागडच्या उड्डाण पुलावर सात दिवसाच आमरण उपोषण केलं होतं. २०१३ ला शहागड ते मुंबई मराठा आरक्षणासाठी पायी दिंडी काढली होती. यावेळी त्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा दिवस उपोषण केलं होतं. तसेच छत्रपती संभाजी नगरला रेल्वे रोको आंदोलन केलं होते. २०२१ मध्ये त्यांनी जालन्याच्या साष्ट पिंपळगावमध्ये तब्बल तीन महिने ठिय्या आंदोलन केलं होतं. याशिवाय गोरीगंधारी येथे आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली होती. मनोज जरांगे २०११ पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रीय आहेत.