मराठी सिनेसृष्टी ही नाविण्यपूर्ण सिनेअभिनेत्यांनी नटलेली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात झाल्यापासून मराठी भाषिक अभिनेते (Marathi Actors) चित्रपटांमध्ये काम करत आहेत. आधीच्या चित्रपटांमध्ये आवाज नसायचा. पुढे बोलपट ही संकल्पना उदयास आली. आणि त्याचबरोबर ठराविक भाषेमध्ये चित्रपट चित्रित आणि प्रदर्शित होऊ लागले. प्रादेशिक तत्वावर त्या-त्या ठिकाणच्या प्रमुख भाषेमध्ये चित्रपट तयार होऊ लागले. याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मराठी आणि त्यासह हिंदी सिनेमांची निर्मिती होऊ लागली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मराठी सिनेसृष्टीसह एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये जलद गतीने बदल होत गेले.
पुढे जाऊन प्रमुख अभिनेते (Marathi Actors)आणि अभिनेत्री यांना अधिकाधिक महत्त्व प्राप्त होऊ लागले. अभिनेत्यांचा चाहता वर्ग वाढत गेला. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये व्ही शांताराम, राजा परांजपे, राजा गोसावी, दादा कोंडके असे अनेक दिग्गज अभिनेते होऊन गेले. अशा अनेक अभिनेत्यांमुळे मराठी प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळला. पुढे ही परंपरा रमेश देव, रवींद्र महाजनी, विक्रम गोखले, श्रीराम लागू यांसारख्या मराठी अभिनेत्यांनी चालवली. त्यानंतर सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे यांनी प्रेक्षकांना त्यांच्या चित्रपटांचे वेड लावले. त्याचबरोबरीला नाना पाटेकर, निळू फुले, अमोल पालेकर, सचिन खेडेकर असे काही अभिनेते प्रमुख प्रवाहासह समांतर चित्रपटांमध्येही झळकत होते. पुढे २००० साल उजाडल्यावर भरत जाधव, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी या अभिनेत्यांच्या फळीने आधीची पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न केला.
आताच्या घडीला सिद्धार्थ चांदेकर, वैभव तत्त्ववादी, ललित प्रभाकर, अमेय वाघ यांसारखी मंडळी मराठी सिनेसृष्टीसाठी आपले योगदान देत असल्याचे दिसते. लोकसत्ताच्या मराठी अभिनेते या पेजवर अशाच आत्ताच्या पिढीतल्या, जुन्या काळातल्या मराठी अभिनेत्यांची माहिती वाचायला मिळेल.