
महाराष्ट्रामध्ये दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज (Kusumagraj) म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त ‘मराठी भाषा दिन’ (Marathi Bhasha Din) साजरा केला जातो. मराठी साहित्यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १९८७ मध्ये त्यांना ‘विशाखा’ या काव्यसंग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारतीय साहित्य विश्वातील हा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त करणारे ते दुसरे मराठी साहित्यिक आहेत. त्यांच्याआधी वि. स. खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. काव्य, लेखन, नाटक अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी अमूल्य असे योगदान दिले होते. असंख्य दर्जेदार कलाकृतींची निर्मिती त्यांनी केली. मराठी ही राजभाषा व्हावी यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले होते.
मराठी भाषेचा गौरव करत असताना कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २०१३ मध्ये कुसुमाग्रज यांचा वाढदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. २१ जानेवारी २०१३ रोजी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले.