‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला मराठी चित्रपटांशी (Marathi Movie) सबंधित सर्व माहिती मिळेल. पारतंत्र्याच्या काळात मूकपटांच्या माध्यमातून भारतीयांपर्यंत चित्रपट पोहोचला होता. १८९५ मध्ये लुमिअर बंधूंनी चित्रपटाचा पहिला शो मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये प्रदर्शित केला. १९१२ मध्ये पहिला मराठी चित्रपट ‘पुंडलिक’चे चित्रीकरण या शहरात झाले. त्यानंतर अथक प्रयत्नांनंतर १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट (मूकपट) तयार केला. मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात ३ मे १९१३ या दिवशी प्रेक्षकांना तो पहिल्यांदा दाखवण्यात आला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट (Indian Cinema) तयार केले. दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटांचे जनक म्हटले जाते. फाळके यांच्याकडून प्रेरणा घेत भारतामधील प्रत्येक प्रांतामध्ये चित्रपटाचे वेड पसरले. थोड्याच कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये सुधारणा झाली. १९३१ नंतर बोलके चित्रपट प्रदर्शित होऊ लागले.
बोलपटांमुळे भाषानुरूप चित्रपटांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. आलम आरा हा पहिला हिंदी बोलपट प्रदर्शित झाल्याच्या एक वर्षानंतर म्हणजे १९३२ मध्ये अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला. ‘प्रभात’चा संत तुकाराम हा चित्रपट १९३७ साली व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट हा बहुमान मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. १९५४ साली पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘श्यामची आई’ या आचार्य अत्रे दिग्दर्शित चित्रपटाने राष्ट्रपती पदक मिळवले होते. सिंहासन, अशी ही बनवाबनवी, एक डाव भुताचा, माहेरची साडी, नवरी मिळे नवऱ्याला, जैत रे जैत, माझा पती करोडपती, पिंजरा, झपाटलेला, आम्ही जातो आमुच्या गावा, जगाच्या पाठीवर, मधुचंद्र, पाठलाग, सामना, हा खेळ सावल्यांचा, कळत नकळत, उंबरठा हे काही गाजलेले मराठी चित्रपट आहेत. मराठी चित्रपटसृष्टीने अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत. श्रीराम लागू, निळू फुले, अरुण सरनाईक, रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन, सुप्रिया, अशोक सराफ, प्रिया अरुण, निवेदिता जोशी, सुधीर जोशी, दिलीप प्रभावळ्कर, अलका कुबल, रमेश भाटकर, अजिंक्य देव, विक्रम गोखले, किशोरी शहाणे, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्मिता पाटील, मोहन आगाशे, संध्या, रंजना, महेश कोठारे, सीमा देव, रमेश देव, काशिनाथ घाणेकर, विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे, गिरीश कर्नाड अशा अनेक नामवंत कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे दादा कोंडके; ज्यांनी अनेक विनोदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत एक काळ असा होता,
जेव्हा विनोदी चित्रपट फार गाजत होते. पण सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांना खूप पसंती मिळते. ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘हर हर महादेव’, ‘पावनखिंड’ यांसारख्या ऐतिहासिक मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मराठी चित्रपट आणि कलाकारांसंबंधित सर्व अपडेट्स तुम्ही येथे वाचू शकता.