मनसे News
९ मार्च २००६ रोजी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (मनसे) (Maharashtra Navnirman Sena) या पक्षाची स्थापना झाली. राज ठाकरे हे पक्षाध्यक्ष आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले तेव्हा राज ठाकरे आणि त्यांना समर्थन करणारा शिवसेनेतील गट नाराज झाला. तेव्हा जानेवारी २००६ मध्ये राज यांनी शिवसेना पक्ष सोडला.
पुढे दोन महिन्यांनी मार्च २००६ मध्ये त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस यांना वैभव प्राप्त करुन देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. काही वर्षांपूर्वी या पक्षाने हिंदुत्त्वाची विचारसरणी स्वीकारली. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचे १३ उमेदवार निवडून आले. त्यानंतर २०१२ च्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने चांगली कामगिरी केली. तेव्हा नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. सुरुवातीच्या काळात हा पक्ष खूप चर्चेत होता. राज ठाकरे यांचे भाषण आणि नेतृत्त्व यांमुळे तरुण या पक्षामध्ये सहभाग घेत होते. अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्येही या पक्षाचे नाव जोडले गेले होते. हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनसेचा प्रभाव कमी होऊ लागला. पक्षाला निवडणुकांमध्ये अपयश मिळू लागले. बरेचसे नेते, प्रवक्ते पक्ष सोडून जाऊ लागले. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या केवळ एकाच उमेदवाराचा विजय झाला होता.
राज ठाकरे आपल्या विधानांवरून नेहमी चर्चेत असतात. त्यांनी मशिदीतील भोंग्यांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा विषय तापला होता. विरोधीपक्षांवर टीका करण्यासह ते मित्रपक्षांवरदेखील टीका करायला मागेपुढे बघत नाहीत. २०२४ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यांनी महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे आणि ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हसके यांच्यासाठी सभा घेतली होती.
Read More