
महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Vidhansabha) हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाद्वारे राज्याचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी, राज्यातील विविध प्रश्नांवर, गंभीर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच शासनाद्वारे केलेल्या कामांवर चर्चा करण्यासाठी, राज्यहितासाठी आवश्यक असलेली नवीन धोरणे राबवण्यासाठी अशा विविध गोष्टींसाठी विधानसभेद्वारे वर्षामध्ये तीन वेळा अधिवेशनाचे नियोजन केले जाते.
उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा ३ ऋतुंच्या वर्गीकरणाप्रमाणे उन्हाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन असे प्रकार पडतात. त्यातील उन्हाळी आणि पावसाळी अधिवेशन हे राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात पार पाडले जाते. तर हिवाळी अधिवेशन राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये आयोजित केले जाते. यावर्षी १७ जुलै २०२३ रोजी पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर अजित पवारांनीही बंडाची भूमिका घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आधी विरोधी पक्ष नेते ही जबाबदारी सांभाळणारे अजित पवार सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असल्याने आता विरोध पक्ष नेता कोण असा प्रश्न विरोधी पक्ष गटातील नेत्यांना पडला. अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये विरोधी पक्ष नेत्याशिवाय कामकाज सुरु होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या विजय वड्डेटीवार यांच्याकडे विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी देण्यात आली.
विरोधी पक्ष नेतेपदाचा मुद्दा सोडल्यास अधिवेशन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील प्रचारांनी गाजले. या व्यतिरिक्त जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदतवाढ, सहकारी संस्थांमध्ये सदस्याच्या सक्रिय सहभागाची सुनिश्चिती करण्यासाठी प्रोत्साहन देणे, नियोजन प्राधिकरणाने राज्य शासनाकडे विकास योजनेचा मसुदा सादर करण्याच्या कालावधीत वाढ, महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा विधेयक, स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठ सुधारणा विधेयक, महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा विधेयक, मुंबई महापालिका सुधारणा, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ, महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, ललित कला शिक्षण मंडळ विधेयक अशा अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा देखील झाली. हे अधिवेशन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये संपले.