
लोकसत्ता च्या या सदरामध्ये तुम्ही नाशिक शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे वाचू शकता. महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेले नाशिक (Nashik)हे शहर भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. भारतातील सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर आणि गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहरात मराठी भाषा बोलली जाते. नाशिक शहराच्या आसपास अनेक धार्मिक स्थळ आहे. त्यापैकी दक्षिण दिशेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहेत; उत्तर दिशेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे. पश्चिम दिशेला त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक शहराच्या नावाबाबत विविध मतप्रवाह आहेत.
नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक, असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. त्याशिवाय नाशिक नावाचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले असावे, असे मानले जाते. पौराणिक संदर्भांनुसार, नाशिकमधील पंचवटी या ठिकाणी वनवासाच्या काळात रामाने वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता.