नाशिक न्यूज Videos
‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला नाशिक (Nashik) शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर मिळतील. नाशिक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील आणि भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक शहर आहे. देशात सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरामध्ये मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी बौद्ध लेणी, उत्तरेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे, तर पश्चिमेस त्र्यंबकेश्वर आहे. पंचवटी हादेखील नाशिक शहराचा एक भाग आहे. पौराणिक संदर्भांनुसार वनवासाच्या काळात रामाने येथे वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.
नाशिक शहराच्या नावामागे दोन कथा प्रसिद्ध आहेत. एका कथेचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले आहे. दुसऱ्या मान्यतेनुसार नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे.
आजही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून, ते भारतातील वेगाने विकसित असलेल्या शहरांपैकी एक आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता
Read More