राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष Photos
राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी १९९९ मध्ये केली होती. या पक्षाचा प्रभाव महाराष्ट्रात अधिक आहे. मात्र २०२३ मध्ये हा पक्ष फुटला. जुलै २०२३ मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार ( Ajit Pawar)यांनी बंडखोरी करत मूळ राष्ट्रवादी पक्ष सोडून आपला एक वेगळा गट तयार केला. महाराष्ट्रात शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचेही दोन गट झाले. हे दोन्ही गट शरद पवार गट आणि अजित पवार गट या नावाने ओळखले जातात.
शिवसेनेतून फुटल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने जशी भाजपाची साथ स्वीकारली त्याच मार्गावर अजित पवार आपल्या समर्थकांसह गेले. अजित पवार भाजपा प्रणित महायुतीतील सरकारमध्ये सहभागी झाले. फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह बहाल केले. अजित पवार गटात प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अमोल मिटकरी, सुनील तटकरे या नेत्यांचा समावेश आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीत अजित पवार यांना महाराष्ट्रात केवळ चारच जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी केवळ एकाच जागेवर अजित पवार गटाला विजय मिळाला. या उलट शरद पवार गटाला महाविकास आघाडीत १० जागा मिळाल्या होत्या. त्यांना ९ जागा जिंकण्यात यश आले. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गट कमजोर झाल्याचे समजले जात होते. मात्र निवडणुकीत विजयश्री खेचत शरद पवार यांनी पक्षाला पुन्हा उभारी मिळून दिली.
पक्षाची स्थापना ( Formation of NCP)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआमध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.
इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी २५ मे १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले. १० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अॅनालॉग) घड्याळ हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. २०२३ मध्ये राष्ट्रवादी हा पक्ष फुटून त्याचे दोन गट झाले. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे पक्ष नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना बहाल केले असून आता अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत.
Read More