पंकजा मुंडे (Pankaja Munde) या महाराष्ट्रातील भाजपाच्या माजी मंत्री, प्रमुख नेत्या व विद्ममान राष्ट्रीय चिटणीस आहेत. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या आहेत. महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील प्रमुख राजकीय चेहरा अशी त्यांची ओळख असून, गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहीलं जातं. २००९ मध्ये गोपीनाथ मुंडे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पहिल्यांदा विधानसभेत पोहचल्या होत्या. यानंतर २०१४ मध्येही त्या आमदार झाल्या आणि राज्यात सेना-भाजपाचं सरकार आल्यानंतर त्या महिला व बालकल्याण मंत्री होत्या.
२०१४ मध्ये आपण लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर २०१५ मध्ये चिक्की घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्या धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्या. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पहिल्यांदा खासदारकीसाठी निवडणुकीत उभ्या राहिल्या. परंतु, शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी त्यांना पराभूत केलं. दरम्यान, पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करावं, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून वाढू लागल्यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेत पाठवलं.