प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) हा भारतीय वेगवान गोलंदाज आहे. तो राज्यस्तरावर कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याचा जन्म १९ फेब्रुवारी १९९७ रोजी कर्नाटकमधल्या बंगळुरु शहरामध्ये झाला. २०१५ मध्ये बांगलादेश-ए विरुद्ध झालेल्या सामन्यामुळे प्रसिद्ध कृष्णा प्रकाशझोतात आला. कर्नाटक आणि बांग्लादेश-ए यांच्यादरम्यान सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यामध्ये कर्नाटक संघाचे ३ वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्याने कृष्णाला संघामध्ये सामील करण्यात आले. मिळालेल्या संधीचं सोनं करत प्रसिद्ध कृष्णाने ५ फलंदाजांना बाद केले. त्याच्या या कामगिरीमुळे कर्नाटक संघाचा विजय निश्चित झाला.
पुढे २०१६-१७ मध्ये त्याला विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Hazare Tropify) खेळायची संधी मिळाली. त्यानंतर त्याने रणजी ट्रॉफी, मुश्ताक अली ट्रॉफी अशा स्पर्धांमध्येही प्रसिद्ध कृष्णा झळकला. थोड्याच कालावधीत इंडिया ए संघात त्याची निवड झाली. दरम्यान २०१८ च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच केकेआर या संघामध्ये कृष्णाला सामील करण्यात आले. कमलेश नागरकोटी या गोलंदाजाच्या जागी त्याला खेळवण्यात आले. मे २०१८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात शिवम मावीच्या ऐवजी प्रसिद्ध कृष्णाची निवड करण्यात आली. २०१८ ते २०२१ या ३ वर्षांच्या कालावधीत तो केकेआरमध्ये होता. पुढे २०२२ च्या लिलावामध्ये राजस्थान रॉयल्सने १० कोटी रुपयांची बोली लावली. राजस्थानच्या संघामध्ये गेल्यानंतर कृष्णाचा खेळामध्ये प्रगती झाल्याचे पाहायला मिळाले.
मार्च २०२१ मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय सामन्यामध्ये प्रसिद्ध कृष्णाला सामील करण्यात आले. ही त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात ठरली. २३ मार्च २०२१ रोजी त्याने पदार्पण केले. या सामन्यामध्ये त्याने ४ गडी बाद केले. भारताने हा एकदिवसीय सामना ६६ धावांनी जिंकला होता. ऑगस्ट २०२३ मध्ये कृष्णाने आंतरराष्ट्रीय टी-२० फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. २०२३ च्या आयपीएलच्या हंगामामध्ये त्याने चांगला खेळ केला होता. एकूण कामगिरी पाहून बीसीसीआयने आशिया कप २०२३ (Asia Cup 2023) च्या संघामध्ये त्याचा समावेश केला आहे.