
पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. तसंच त्याआधी ते दिल्लीत सोनिया गांधी यांच्यासमवेत काँग्रेस कार्यालयात कार्यरत होते. काँग्रेसमध्ये जी २३ हा जो गट तयार झाला त्यातले महाराष्ट्राचे नेते पृथ्वीराज चव्हाण होते. तसंच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली पाहिजे, लोकशाही पद्धतीने अध्यक्ष निवडला गेला पाहिजे अशीही भूमिका त्यांनी मांडली होती.
पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म इंदूरमध्ये मराठी कुटुंबात झाला. त्यांचे आईवडीलही राजकारणात होते. त्यांचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलाताई चव्हाण हे दोघेही काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते होते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू पृथ्वीराज यांना लहानपणापासूनच मिळाले. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री या नात्याने त्यांनी अनेक पदांचा कार्यभार पाहिला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, संसदीय व्यवहार आणि पंतप्रधान कार्यालय ही त्यापैकी प्रमुख खाती होती. काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय करारांमध्ये त्यांनी त्याकाळात महत्त्वाची भूमिका बजावली. विविध कार्यक्रम तसंच शिष्टमंडळाचे सदस्य असलेल्या चव्हाण यांनी अमेरिका, फ्रान्स, जपान, जर्मनी, चीन, इटली, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड यासह अनेक देशांचे सरकारी खर्चाने दौरे केले आहेत.