महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पुढारी आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray) चुलत भाऊ आहेत. राज ठाकरे यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीकांत ठाकरे आणि आईचे नाव कुंदा ठाकरे आहे. त्यांना २ मुले आहेत आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे या मराठी चित्रपटसृष्टीतील छायाचित्रकार, निर्माता-दिग्दर्शक मोहन वाघ यांच्या कन्या आहेत. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हेदेखील आता राजकारणात सक्रिय झाले आहेत.
शिवसेनेत असताना भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आणि जाहिर सभांमधून राज ठाकरेंनी आपल्या वक्तृत्व आणि नेतृत्व गुणांची चुणूक दाखवली. शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर त्यांनी ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाची स्थापना केली. मनसेची स्थापना होताच, परप्रांतियांचे राज्यात येणारे लोंढे, भूमिपुत्रांचे हक्क, मराठी भाषेला प्राधान्य, रेल्वेमध्ये होणारी उत्तर भारतीयांची नोकरभरती, मुंबईच्या समुद्रकिनारी होणारी छठपुजा या मुद्द्यांवरून जोरदार रणशिंग फुंकले.
मनसेने टोल विरोधात छेडलेले आंदोलनही लक्षवेधी ठरले. तसेच मशिदीवरील लाऊडस्पीकर आणि मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेने आक्रमक आंदोलन केले. राज ठाकरेंच्या आक्रमक आणि स्थानिक मुद्द्यांच्या राजकारणामुळे २००९ साली विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. मात्र त्यानंतर पक्षाला गळती लागत २०१४ आणि २०१९ साली राज ठाकरेंना केवळ एक आमदार निवडून आणता आला.
राज ठाकरेंनी वेळोवळी घेतलेल्या राजकीय भूमिका अनेकदा वादात अडकल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत मनसेचे उमेदवार उभे केले, मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. २०१९ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपाच्या विरोधात त्यांनी जोरदार प्रचार केला. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अधिकृतरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत महायुतीचा घटक होणे पसंत केले. तसेच महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या.