सध्या राजस्थानमध्ये ५.२ कोटी लोकांकडे मतदान करण्याचा अधिकार आहे. राजस्थान विधानसभेच्या (Rajasthan Election 2023) २०० जागांसाठी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे. राज्यातील एकूण २०० विधानसभा जागांपैकी ३४ जागा या अनुसूचित जागींच्या उमेदवारांसाठी तर २५ जागा या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
२०१८ रोजी झालेल्या विधानसभेची मुदत १४ जानेवारी २०२४ रोजी संपणार असल्याने त्याआधीच मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याचा निवडणूक आयोगाचा मानस आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर लगेच ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल (Rajasthan Assembly Election 2023 Result) समोर येणार आहेत. राजस्थानमध्ये सत्ता टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात कॉंग्रेस आहे. तर भाजपा तेथील खासदांना उमेदवारी देत आपल्याकडे वळवत असल्याचेही म्हटले जात आहे. या प्रयत्नामध्ये अनेक नेत्यांनी खासदारकीचे तिकीट गमावल्याने पक्षात सध्या अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळते.
२०१८ च्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसने २०० जागांपैकी १०० जागांवर वर्चस्व मिळवले होते. तर भाजपाला ७३ जागांवर समाधान मानावे लागले होते. तेव्हा बहुमतापेक्षा फक्त १ जागा कमी असल्याने कॉंग्रेसने राजस्थानमध्ये बहुजन समाज पक्षाच्या मदतीने सरकार स्थापन केले होते.