समांथा रुथ प्रभू Photos
समांथा रुथ प्रभू ही सध्याची दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिचा जन्म २८ एप्रिल १९८७ रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला होता. तिचे वडील तेलुगू आणि आई मल्याळम भाषिक आहेत. तिला दोन मोठे भाऊ आहेत. समांथा तमिळ, तेलुगू आणि मल्याळम अशा तिन्ही भाषा उत्तमपणे बोलते. चेन्नई शहरामध्ये तिने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. स्टेला मॅरिस कॉलेजमधून तिने वाणिज्य शाखेत पदवी मिळवली आहे. पदवीचे शिक्षण सुरु असताना समांथाने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. काही वर्ष मॉडेलिंग केल्यानंतर तिला चित्रपटांमध्ये काम करायची संधी मिळाली. २०१० मध्ये तिचा ‘ये माया चेसवे’ (ye maaya chesave) हा पहिला तेलुगू चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये तिच्यासह नागा चैतन्य अक्किनेनी प्रमुख भूमिकेत होता. याच वर्षी तिने तमिळ सिनेसृष्टीदेखील पदार्पण केले. तिने इगा, रंगस्थलम, सुपर डिलक्स अशा अनेक दर्जदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांप्रमाणे तिचे खासगी आयुष्य देखील नेहमी चर्चेत राहिले. २०१० पासून समांथा आणि नागा चैतन्य एकमेकांना डेट करत होते. सहा-सात वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये गोव्यात त्यांचा लग्नसोहळा पार पडला. यानंतर तिने ‘समांथा अक्किनेनी’ या नावाचा वापर करायला सुरुवात केली. जुलै २०२१ मध्ये तिने सोशल मीडियावरुन ‘अक्किनेनी’ नाव काढून टाकले. यामुळे चाहत्यांना या जोडप्यामध्ये काहीतरी बिनसल्याची शंका आली. पुढे ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले. या घटस्फोटामुळे समांथा पुन्हा चर्चेत आली. यावरुन तिच्यावर टीका देखील झाली. दरम्यानच्या काळात ‘पुष्पा’ आणि ‘द फॅमिली मॅन सीझन २’ या दोन कलाकृतींमुळे समांथाच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली. काही महिन्यांपूर्वी तिने सोशल मीडियावर मायोसायटीस हा गंभीर आजार झाला असल्याची माहिती दिली.Read More