![wells fraud Maharashtra](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-13T063048.618.jpg?w=310&h=174&crop=1)
संदीपान भुमरे हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत. संदीपान भुमरे हे पैठण तालुक्यातील एका कारखान्यात काम करत असत. मात्र, १९८८ मध्ये पैठण तालुक्यातील पाचोडमध्ये संदीपान भुमरे यांनी शिवसेनेची शाखा स्थापन करत शाखाप्रमुख म्हणून राजकारणाला सुरुवात केली. त्यानंतर १९८९ मध्ये पाचोड ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. १९९२ साली त्यांनी पंचायत समिती निवडणूक लढवली आणि पैठण पंचायत समितीच्या उपसभापती त्यांची निवड झाली. १९९५ साली पैठण विधानसभा मतदारसंघातून संदीपान भुमरे यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली. त्यानंतर २००९ वगळता संदीपान भुमरे सलग पैठणमधून आमदार झाले. २०१९ च्या निवडणुकीत ते पाचव्यांदा आमदार झाले. या कार्यकाळात त्यांनी राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळली. तसेच छत्रपती संभाजीनगरचे ते पालकमंत्रीही झाले. यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते छत्रपती संभाजीनगरमधून खासदार झाले आहेत. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून भुमरे यांची पक्षात ओळख आहे.