शरद पवार News
शरद पवार हे भारतातील प्रमुख राजकारण्यांपैकी एक आहेत. शरद पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुण्यातील बारामती तालुक्यात झाला. ५० वर्षांहून अधिक काळ संसदीय राजकारण करणारे नेते म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. काँग्रेसपासून वेगळे होऊन त्यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) स्थापना केली. मात्र २०२३ साली झालेल्या पक्षातील फुटीनंतर आता त्यांच्या पक्षाचे नाव “राष्ट्रवादी कांग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष”, असे आहे. तर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचे पुतणे अजित पवार यांच्याकडे आहे.
शरद पवारांनी १९६० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९६७ मध्ये ते पहिल्यांदा बारामतीमधून विधानसभेवर निवडून आले आणि १९७८ मध्ये महाराष्ट्राचे सर्वात कमी वयातील मुख्यमंत्री झाले. त्यांनी तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले. १९८४ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. केंद्रातही त्यांनी संरक्षण मंत्री, कृषी मंत्री अशी महत्त्वाची खाती सांभाळून त्यावर आपली छाप सोडली. राजकारणाबरोबरच शरद पवार यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप, अंडरवर्ल्ड संबंध याशिवाय अनेक वाद झाले. तरीही चाणाक्ष पुढाऱ्याप्रमाणे त्यांनी विविध पक्षांसह युती करुन आपले राजकीय अस्तित्व आजही अबाधित ठेवले आहे. २०१९ साली विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांना एकत्र आणत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. शरद पवारांच्या या खेळीमुळे १०६ आमदार असलेल्या भाजपाला अडीच वर्ष सत्तेपासून दूर राहावे लागले.
२०२३ मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा घेतला. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधिमंडळात अजित पवार हा दावा टिकवण्यात यशस्वी झाले. पक्ष फुटीनंतरही शरद पवार यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कडवी झुंज देत १० उमेदवारांपैकी ८ उमेदवार जिंकून आणण्यात यश मिळवले. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाला एकच खासदार निवडून आणता आला. या निवडणुकीत शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका झाली. ते नेतृत्व सोडत नसल्याचा आरोप अजित पवार आणि त्यांच्याबरोबरच्या नेत्यांनी केला. तरीही हे हल्ले पचवून शरद पवारांनी आपल्या पक्षाला यश मिळवून दिले.
Read More