शार्दुल ठाकूर Videos

शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) हा भारतीय क्रिकेटपटू आहे. तो उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो. त्यासह शेवटच्या फळीमध्ये फलंदाजी करण्याचा अनुभवही शार्दुलकडे आहे. अंगी असलेल्या कौशल्यामुळे त्याला लॉर्ड हे टोपननाव पडले आहे. शार्दुलचा जन्म १६ ऑक्टोबर १९९१ रोजी महाराष्ट्रातील पालघरमध्ये झाला. शालेय जीवनामध्येच त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यासाठी तो पालघरवरुन दक्षिण मुंबईला लोकलने प्रवास करत यायचा. मेहनत आणि चिकाटी या गुणांमुळे त्याचा खेळ दिवसेनदिवस चांगला होत गेला.


कमी उंची आणि जास्तीचे वजन या गोष्टींमुळे सुरुवातीच्या काळात शार्दुलवर टीका केली जात असे. असे असतानाही त्याने मुंबईच्या संघात स्थान पटकावले. २०१२-१३ च्या रणजी स्पर्धेमध्ये त्याने मुंबईकडून खेळत पदार्पण केले. २०१३-१४ च्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने सहा सामन्यांमध्ये २६.२५ च्या सरासरीने २७ गडी बाद केले. पुढच्या हंगामामध्ये त्याने दहा रणजी सामन्यांमध्ये २०.८१ च्या सरासरीने ४८ गडी बाद केले. तेव्हा शार्दुलने ५ सामन्यांमध्ये ५ गडी बाद करण्याचा विक्रम देखील केला. पुढे त्याला रणजी, विजय हजारे ट्रॉफीसह अन्य स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. २०१५-१६ मध्ये रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये शार्दुलने सौराष्ट्र संघाच्या आठ फलंदाजांना बाद करत मुंबईला जेतेपद मिळवून दिले.


२०१५ च्या आयपीएल (IPL) हंगामामध्ये त्याच्यावर किंग्स इलेवन पंजाब या संघाने बोली लावली. २०१५ आणि २०१६ या दोन वर्षांमध्ये तो पंजाबकडून खेळला. पुढे २०१७ मध्ये राइजिंग पुणे सुपरजायंट्समध्ये शार्दुल ठाकूर सामील झाला. या काळात त्याचा खेळ आणखी चांगला होत गेला. तो ऑल-राऊंडर म्हणून देखील नावारुपाला आला. पुणे नंतर त्याला चेन्नईच्या संघातून खेळण्याची संधी मिळाली. ३ वर्ष सीएसकेकडून खेळल्यानंतर लिलावामध्ये त्याच्यावर दिल्ली संघाकडून बोली लावण्यात आली. २०२३ पासून तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग आहे.


शार्दुलने ऑगस्ट २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. पुढे फेब्रुवारी २०१८ मध्ये त्याने टी-२० मध्येही पदार्पण केले. त्याच वर्षी ऑक्टोबर २०१८ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धचा त्याचा पहिला कसोटी सामना होता. एकूण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये त्याने ८ कसोटी सामन्यांमध्ये २५४ धावा केल्या आहेत, तर २९ गडी बाद केले आहेत; ३५ एकदिवसीय सामन्यांमध्ये २९८ धावा केल्या आहेत, तर ५० गडी बाद केले आहेत; २५ टी-२० सामन्यांमध्ये ६९ धावा केल्या आहेत, तर ३३ फलंदाजांना बाद केले आहे. आगामी आशिया कप २०२३ च्या भारतीय संघामध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. शार्दुल ठाकूरला विश्वचषक स्पर्धेमध्ये संधी मिळू शकतो असे म्हटले जात आहे.



Read More

ताज्या बातम्या