शिवजयंती २०२४ Photos

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रासह भारतभर साजरी केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (१९ फेब्रुवारी १६३०) रोजी शिवरायांचा जन्म झाला होता. महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्तासाठी हा दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे असतो. गेल्या काही वर्षांमध्ये शिवजयंती मोठ्या जल्लोषामध्ये साजरी केली जात आहे. १८६९ मध्ये महात्मा फुले यांनी रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्यानंतर १८७० मध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली गेली. पुढे ब्रिटिशांविरोधात भारतीय जनमानसामध्ये एकी निर्माण व्हावी, यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवासह सार्वजनिक शिवजयंतीच्या प्रथेची सुरुवात केली. १८९५ मध्ये पहिल्यांदा शिवजयंतीचा उत्सव सार्वजनिकरीत्या साजरा केला गेला. राज्य सरकारने २००१ मध्ये १९ फेब्रुवारी १६३० ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. शिवरायांची जयंती तिथीनुसार साजरी करावी की तारखेनुसार या मुद्यावरुन महाराष्ट्रामध्ये वाद आहे. त्यामुळे तारखेला मान्यता देणारा गट १९ फेब्रुवारीच्या दिवशी शिवजयंती आहे असे मानतो. तर फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार शिवजयंती साजरी करणारा एक गट आहे.Read More