श्रेयस अय्यर Photos
श्रेयस अय्यर हा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म ६ डिसेंबर १९९९ रोजी मुंबईतील चेंबूर येथे झाला. त्याचे शिक्षण माटुंगा येथील डॉन बॉस्को हायस्कूल झाले आहे. तसेच तो रामनारायण पोद्दार महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. लहानपणापासून त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शिवाजी पार्क जिमखाना येथे तो प्रशिक्षण घेत होता. याच सुमारास श्रेयसमधील कौशल्य प्रशिक्षक प्रवीण आम्रे यांनी हेरले. कॉलेजमध्ये असताना त्याने अनेक महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये भाग घेत आपली क्षमता दाखवून दिली.
२०१४ मध्ये त्याला यूकेच्या ट्रेंट ब्रिज क्रिकेट संघाकडून खेळायची संधी मिळाली. या दौऱ्याच्या ३ सामन्यांमध्ये त्याने ९९ च्या सरासरीने २९७ धावा केल्या. त्यातल्या एका सामन्यामध्ये त्याने १७१ धावा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच वर्षी श्रेयरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये झळकला. पुढे २०१४-१५ च्या रणजी स्पर्धेमध्ये मुंबई संघामध्ये त्याची निवड करण्यात आली. तेव्हा दोन्ही स्पर्धांमध्ये त्याने चांगला खेळ करुन दाखवला. तो आजही मुंबई संघाकडून राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळत आहे. पुढे २०१८-१९ मध्ये देवधर ट्रॉफीसाठीही त्याला निवडण्यात आले. स्पर्धेतील तीन सामन्यांमध्ये त्याने १९९ धावा केल्या होत्या. तेव्हा तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला होता.
रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी अशा स्पर्धांमधील चांगला खेळ पाहून श्रेयसला आयपीएलमध्ये सहभागी करण्यात आले. २०१५ मध्ये आयपीएलच्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने त्याच्यावर २.६ कोटी रुपयांची बोली लावली. २०१५ ते २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीत दाखवलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे २०१८ मध्ये दिल्लीच्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी श्रेयसला देण्यात आली. २०२१ पर्यंत तो दिल्लीच्या संघात होता. आयपीएल २०२१ सुरु असताना दुखापतींमुळे त्याला उपचार घेण्यासाठी जावे लागले. २०२२ च्या आयपीएल लिलावामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने १२.२५ कोटी बोली लावत त्याला संघात सामील केले.
२०१७ मध्ये श्रेयर अय्यरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नोव्हेंबर २०१७ मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० सामन्यामध्ये त्याला समाविष्ट करण्यात आले होते. पुढे डिसेंबर २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यामध्ये त्याला खेळायची संधी देण्यात आली. २०२१ मध्ये त्याने कसोटी फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. श्रेयसने आंतरराष्ट्रीय स्तरावर ३२ कसोटी सामन्यांमध्ये ६२४ धावा; ४७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १,५९३ धावा; ६० टी-२० सामन्यांध्ये १,०४३ धावा केल्या आहेत. भारतीय संघातील युवा फळीमध्ये त्याचा समावेश होतो. भविष्यात श्रेयस आणखी चांगला खेळ दाखवेल अशी त्याच्या चाहत्यांना आशा आहे. लवकरच सुरु होणाऱ्या आशिया कप २०२३ साठीच्या भारतीय संघामध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. तो मध्यम फळीत चौथ्या क्रमांकावर खेळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेमध्ये तो भारताकडून खेळू शकतो असेही म्हटले जात आहे.
Read More