शुबमन गिल News
शुबमन गिल (Shubman Gill) हा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म ८ सप्टेंबर १९९९ रोजी पंजाबमध्ये झाला. त्याच्या वडिलांना क्रिकेटपटू बनण्याची इच्छा होती. लहानपणी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. प्रशिक्षणासाठी ते मोहाली येथे राहायला गेले. त्यानंतर शुबमनला पंजाबच्या संघाकडून (Punjab Team)खेळायची संधी मिळाली. राज्यस्तरीय अंडर-१६ स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०१६-१७ मध्ये त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. पुढच्या वर्षी त्याला रणजी स्पर्धेमध्ये खेळायची संधी मिळाली. या दोन्ही महत्त्वपूर्ण स्पर्धोंमध्ये शुबमनने चांगला खेळ करत अनेक विक्रम केले. पुढे त्याला देवधर ट्रॉफीमध्ये इंडिया-सीकडून खेळला.
राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये कौशल्य दाखवल्यानंतर २०१८ मध्ये शुबमन गिल अंडर-१९ विश्वचषकासाठीच्या भारतीय संघामध्ये सामील झाला. त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. झालेल्या एकूण सामन्यांमध्ये त्याने १२४.०० च्या सरासरीने ३७२ धावा केल्या. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये त्याने नाबाद १०२ धावा केल्या. शुबमन अंडर-१९ विश्वचषकामध्ये स्टार प्लेयर म्हणून झळकला. त्याच वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये शुबमन गिल या तरुण खेळाडूवर कोलकाता नाइट रायडर्स संघाने सर्वाधिक बोली लावली. २०१८-२०२१ या काळामध्ये तो केकेआरकडून खेळला. पुढे रिटेन न केल्याने २०२२ मध्ये तो गुजरात टायटन्स या संघात सामील झाला. २०२३ च्या आयपीएलच्या १६ व्या हंगामामध्ये त्याने तुफान फलंदाजी करत ऑरेन्ज कॅप मिळवली होती.
२०१९ मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताच्या संघात शुबमन गिलचा समावेश करण्यात आला. अशा प्रकारे त्याने एकदिवसीय क्रिकेट फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. पुढे २०२० मध्ये तो पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. तर २०२३ मध्ये त्याला भारतीय संघातून टी-२० सामना खेळायची संधी मिळाली. एकूण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये शुबमन गिलने १८ कसोटी सामन्यांमध्ये ९६६, २७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १,४३७ आणि ४५ टी-२० सामन्यांमध्ये २९५ धावा केल्या आहेत. आयपीएल तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये उत्तम खेळ दाखवल्याने भारतीय संघात त्याने जागा पक्की केली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मासह सलामीवीर म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. येत्या आशिया कप २०२३ मध्येही त्याचा समावेश सलामीवीर फलंदाज म्हणून करण्यात आला आहे. आशिया कपसह विश्वचषकामध्ये शुबमन दिलेली जबाबदारी पार पाडेल अशी चाहत्यांना आशा आहे.
क्रिकेटव्यतिरिक्त शुबमन त्याच्या फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे. त्याने ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ या चित्रपटातील पवित्र प्रभाकर या पात्राच्या पंजाबी डबिंगसाठी आवाज दिला आहे. अनेक अभिनेत्रीशी त्याचे नाव जोडले जात आहे.
Read More