दहावी (SSC) हे वर्ष प्रत्येक विद्यार्थासाठी खूप महत्त्वपूर्ण वर्ष असते. दहावीमध्ये मिळावलेल्या गुणांच्या आधारे आयुष्याची पुढील वाटचाल ठरत असते असे म्हटले जाते. त्यामुळे इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थी अधिक मेहनत करण्याच्या तयारीत असतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फ दरवर्षी दहावीची परीक्षा म्हणजेच एसएससीची परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्र राज्यात प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी एसएससीची परीक्षा देत असतात. त्यातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील शिक्षण घेण्यासाठी विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीन शाखांपैकी एका शाखेची निवड करुन महाविद्यालयात प्रवेश घेतात. पण चांगल्या आणि नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांना दहावीच्या परीक्षेमध्ये चांगले गुण असावे लागतात.
या कारणामुळे अनेक विद्यार्थी इयत्ता दहावीला जास्तीचे कष्ट घेत असतात, जेणेकरुन चांगल्या महाविद्यालयात त्यांना प्रवेश घेता येईल. दहावीची परीक्षा ही फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान असते. त्यानंतर मे महिन्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एसएससीचा निकाल लागतो. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा देखील असतात. या परीक्षा जुलै महिन्यात घेतल्या जातात आणि काही महिन्यात लगेच त्यांचे निकाल जाहीर केले जातात.
आजकाल महाविद्यालयांतील प्रवेशासाठी कटऑफमध्ये खूप जास्त स्पर्धा असल्याचे पाहायला मिळते. महाराष्ट्र राज्यामधील एसएससीच्या निकालाचा विचार करायला गेल्यावर अनेकदा कोकण विभागाने त्यामध्ये बाजी मारल्याचे लक्षात येते. लोकसत्ता डॉट कॉमच्या एसएससी या पेज/सदरावर इयत्ता दहावी, त्याचा अभ्यासक्रम, परीक्षा, परीक्षेचे वेळापत्रक तसेच निकालाचे वेळापत्रक अशा संपूर्ण गोष्टींची माहिती वाचकांना वाचायला मिळेल. त्याशिवाय दहावीनंतर काय करावे याबाबतचे काही आर्टिकल्स पाहायला मिळतील.