
सुधीर मुनगंटीवार हे राजकारणी असून ते भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. सुधीर मुनगंटीवार यांचा जन्म ३० जुलै १९६२ रोजी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात झाला. मुनगंटीवार यांनी एम. कॉम., एल. एल. बी., एम. फिल., डी. बी. एम., बी.जे. इत्यादी पदव्या संपादन केल्या आहेत.
सुधीर मुनगंटीवार यांनी महाविद्यालयात असताना १७ व्या वर्षी छात्रसंघाची निवडणूक लढवली होती. तसेच या निवडणुकीत त्यांनी विजयही मिळवला होता. सरदार पटेल महाविद्यालयाच्या छात्रसंघाची निवडणूक जिंकून ते सरचिटणीसपदी निवडून आले होते. त्यानंतर १९८१ मध्ये ते चंद्रपूर शहर भाजपाचे चिटणीस झाले.
सुधीर मुनगंटीवार यांनी १९९५ मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी ५५ हजार मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर सलग ६ वेळा ते चंद्रपूर मतदारसंघातून ते निवडून आले. भाजपा-सेनेच्या युती सरकारमध्ये ते पर्यटन आणि ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्रीदेखील होते. २००९ ते २०१३ दरम्यान, ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षही होते. सुधीर मुनगंटीवर हे विद्यमान महाराष्ट्र सरकारमध्ये सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय या खात्यांचे मंत्री आहेत.