
सुशील कुमार शिंदे हे भारतीय राजकारणी आहेत. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १९४१ रोजी सोलापूर जिल्ह्यात झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय उर्जामंत्री, लोकसभेचे नेते अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं. संघर्षशील राजकारणी अशी सुशीलकुमार शिंदे यांची ओळख आहे. इयत्ता आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सोलापूरच्या न्यायालयात शिरस्तेदाराची नोकरी केली. १९६५ साली बीए पास झाल्यावर नोकरी सोडून त्यांनी पुणे गाठले. येथे कायद्याचे शिक्षण घेत असतानाच पोलीस उपनिरीक्षकपदासाठी त्यांनी मुलाखत दिली आणि पोलीस सेवेत रुजू झाले. काही वर्ष मुंबईच्या सीआयडी विभागात काम केल्यानंतर शरद पवार यांच्या आग्रहामुळे नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी १९७१ साली पूर्णवेळ राजकारणात प्रवेश केला.
सुशील कुमार शिंदे १९७३ साली सोलापूरच्या करमाळा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. सुशीलकुमार शिंदे १६ जानेवारी २००३ ते १ नोव्हेंबर २००४ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही होते. २००४ ते २००६ या कालखंडात त्यांनी आंध्र प्रदेशाचे राज्यपाल म्हणूनही काम केलं. डॉ. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात ते गृहमंत्री होते. सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला. सलग साडेसहा वर्षे केंद्रीय ऊर्जामंत्री पदावर राहणारे आणि लोकसभेच्या नेतेपदी निवड होणारे ते पहिले मराठी नेते होते. २०२३ साली त्यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली.