सुषमा अंधारे या शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत. राजकारणाबरोबर त्या प्रसिद्ध वक्त्या आणि लेखिकासुद्धा आहेत. त्या आक्रमक शैलीत विरोधकांचा समाचार घेतात. लोकसभा निवडणुकीत त्या शिवसेना ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकही होत्या. सुषमा अंधारे या प्राध्यापक असून पुरोगामी विचारांच्या आहेत. आंबेडकरी चळवळीतील एक आक्रमक आणि रोखठोक मत मांडणाऱ्या वक्त्या म्हणून सुषमा अंधारे यांनी स्वतंत्र असा ठसा उमटवलेला आहे. २८ जुलै २०२२ ला त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच प्रवेश केला आणि अल्पावधीत त्यांची शिवसेना ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. सुषमा अंधारे एम.ए., बीएड पदवी धारक असून त्यांनी वकिलीचंही शिक्षण घेतलं आहे. राज्यशास्त्र, समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या आणि पुरोगामी, स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या, विमुक्त आणि आंबेडकरी चळवळीतील सामाजिक, राजकीय कार्यकर्त्या अशी त्यांची राज्यभर ओळख आहे. सुषमा अंधारे आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या. मात्र, त्यानंतर त्यांनी जुलै २०२२ ला शिवसेनेचा झेंडा हातात घेतला.