३० नोव्हेंबर रोजी तेलंगणामध्ये ११९ मतदार संघांसाठी मतदान (Telangana Election 2023) होणार आहे. यातील १९ जागा या अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आणि १२ जागा अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर २०२३ च्या शेवटी मतदान झाल्यानंतर मतमोजणी पूर्ण होऊन निकाल ३ डिसेंबर २०२३ रोजी जाहीर केला जाईल. सध्या तेलंगणामध्ये मतदान करण्याची पात्रता असलेले ३ कोटी नागरिक आहेत. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांचा कार्यकाळ ६ जानेवारी २०२४ रोजी पूर्ण होत आहे. तेव्हा या राज्यामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणुक आयोगाने घेतला आहे.
२०१८ मध्ये तेलंगणा विधानसभेच्या (Telangana Assembly Election 2023) एकूण ११९ जागांपैकी ८८ जागांवर भारत राष्ट्र समितीने, १९ जागांवर कॉंग्रेसने विजय मिळवला होता. याउलट सर्व मतदार संघात आपले उमेदवार उभे करुनही तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाचा फक्त एक उमेदवार निवडून आला. कर्नाटक विजयानंतर तेलंगणावर छाप पाडण्याच्या प्रयत्नामध्ये कॉंग्रेस आहे. तर बीआरएस सत्ता टिकवून ठेवू पाहत आहे. यामध्ये भाजपा आपला जुना पराभव विसरुन या राज्यामध्ये विजय मिळवण्याची तयारी करत आहे.