उद्धव ठाकरे News
उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे ते अध्यक्ष होते. मात्र २०२२ साली पक्षात फूट पडल्यानंतर त्यांना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह गमवावे लागले. उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबईत झाला आणि दादरमधील बालमोहन विद्यामंदिरमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. जेजे स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर उद्धव ठाकरे यांनी रश्मी पाटणकर यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे मोठे चिरंजीव आदित्य ठाकरे हेदेखील शिवसेनेचे नेते आहेत. २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले होते. उद्धव ठाकरे हे छायाचित्रकारही आहेत. त्यांची ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पहावा विठ्ठल’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.
२००२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे (Shivsena) प्रचार प्रभारी बनल्यानंतर ठाकरे यांनी राजकारणात पदार्पण केले. २००३ मध्ये त्यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि २००६ मध्ये ते पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाचे मुख्य संपादक झाले. २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि २०१३ मध्ये ते अध्यक्षपदी विराजमान झाले. कोणत्याही सरकारमध्ये स्थान मिळवणारे ठाकरे कुटुंबातील ते पहिले सदस्य ठरले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारून स्वतःबरोबर पक्षाचे ४० हून अधिक आमदार आणि १३ खासदारांसह शिवसेना पक्ष ताब्यात घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर आणि न्यायालयात संघर्ष करत कडवी झुंज दिली. पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतरही २०२४ च्या निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाने नऊ जागांवर विजय मिळविला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या.
Read More