डॉ.विश्वजीत कदम हे काँग्रेसचे नेते आहेत. पुण्यामध्ये १३ जानेवारी १९८० रोजी त्यांचा जन्म झाला. हॉवर्ड युनिव्हर्सिटीमधून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे ते चिरंजीव आहेत. विश्वजीत कदम हे सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. राज्यातील तरुण नेत्यांपैकी एक डॉ.विश्वजीत कदम यांच्याकडे पाहिलं जातं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष, भारती विद्यापीठाचे सचिव अशा पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. सहकार, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात विश्वजीत कदम सक्रिय आहेत. २०११ आणि २०१४ या दरम्यान महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर काम केलं. तसेच महाराष्ट्राच्या सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या विभागांचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून विश्वजीत कदम यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. पण यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत झालेल्या गोंधळात विश्वजीत कदम यांची भूमिकाही चांगलीच चर्चेत राहिली.