“राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर आपण समाजाची एक बैठक बोलावून पुढची रणनिती ठरवू. २८८ मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करायचे की त्यांचे २८८ उमेदवार पाडायचे त्याचा निर्णय त्या बैठकीत घेतला जाईल”, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आज (७ जुलै) परभणी येथे मराठा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले, “मला अपेक्षा आहे की हे सरकार येत्या १३ जुलैपर्यंत आपल्याला आरक्षण देईल आणि नाही दिलं तर यांचे २८८ आमदार पडलेच म्हणून समजा.”
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “कोणत्याही पक्षाच्या नेत्याला घाबरायचं नाही. मी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना सांगतो, राज्यात कुठल्याही नेत्याची दहशत नाही. त्यामुळे कोणालाही घाबरण्याचं कारण नाही. या नेत्यांपेक्षा गोरगरीब मराठ्यांची ताकद वाढली पाहिजे. आज मी तुम्हाला माझं आजवर पाहिलेलं एक स्वप्न सांगणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं आणि त्या आरक्षणातून आपली लेकरं चांगलं शिक्षण घेतील, सरकारी नोकऱ्या मिळवतील, आपली लेकरं आयएएस, आयपीएस झालेली मला पाहायचं आहे. त्यांच्या अंगावर मला वर्दी (शासकीय गणवेश) पाहायची आहे. हे गेल्या अनेक वर्षांपासूनचं माझं स्वप्न आहे आणि आता ते आपण पूर्ण करणार आहोत.”
मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते म्हणाले, “या महाराष्ट्रात गोरगरीब मराठ्यांना किंमत मिळाली पाहिजे. मराठ्यांशिवाय महाराष्ट्रात कोणाचंही पान हालता कामा नये. त्यासाठी आपण एकजूट निर्माण केली पाहिजे. या आरक्षणाच्या लढाईदरम्यान आपली जी एकजूट तयार झाली आहे ती कायम राहू द्या. आगामी निवडणुकांमध्ये एकजुटीने मतदान करा. गोरगरीब मराठ्यांनी एकगठ्ठा मतदान केलं तर आपलं अस्तित्व सर्वजण मान्य करतील. तसं करू लागल्यावर सर्वजण गोरगरीब मराठ्यांना नमस्कार करतील. आताही नमस्कार करू लागले आहेत. अशीच किंमत गोरगरीब मराठ्यांना मिळाली पाहिजे. त्यासाठीच आपण ही लढाई लढत आहोत.
हे ही वाचा >> “१३ जुलैला शिवभक्तांसह विशाळगडावर जाऊन आम्ही…”, अतिक्रमणाविरोधात संभाजीराजे आक्रमक; सरकारला अल्टीमेटम
मनोज जरांगे म्हणाले, काही लोक आता आपल्याला त्रास देऊ लागले आहेत, बोलू लागले आहेत. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. मात्र, या लढाईदरम्यान आपल्याकडून कुणी दुखावलं गेलं असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. या भाषणाच्या शेवटी मी एकच गोष्ट सांगतो, आपल्यातील एकजूट कायम राहिली पाहिजे. मराठा समाजासाठी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. मराठा समाजाच्या लेकरांसाठी मला माझं बलिदान द्यावं लागलं तरी मी मागे हटणार नाही. तुमच्या मुलांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी एक इंच मागे हटणार नाही. तुम्ही फक्त एकजुटीने माझ्याबरोबर उभे राहा.