मराठी वाचकांना काय हवे आहे याची अचूक जाण पाडगावकरांना होती. सहजता आणि सरलता हे त्यांचे मोठे वैशिष्टय़. याच वैशिष्टय़ाने त्यांनी अनेक भावगीतांना उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी कवितेइतकेच स्वत:वरही प्रेम केले. त्यांच्या जगण्यातून ते दिसत असे..
मराठी भाषेस प्रेमाचे तसे वावडेच. सारा भर अव्यक्तावरच. मग ते प्रेम प्रियकर-प्रेयसीचे यांतील असो वा अन्य कोणत्या नात्याचे. ते फक्त ज्याने-त्याने समजून घ्यावयाचे. या प्रेमास मोकळेपणाने व्यक्त करण्याची चव पहिल्यांदा चाखवली ती रविकिरण मंडळाने. माधव ज्युलियन, गिरीश आदींनी मनातील प्रेमभावना नि:संकोचपणे ओठांवर आणली. त्या प्रेमभावनेचा शब्दोत्सव मांडण्याचे श्रेय मात्र जाते ते बाकिबाब बा. भ. बोरकर यांच्याकडे. त्यांच्या कवितेत वाजत आलेल्या पायजणांची मंद मंद रुणझुण आजही मराठी कवितेत रुंजताना दिसते. त्या रुणझुणीचा धागा तीमधील गेयता, नादमयता आणि शब्दकळा यांसह सशक्तपणे रुजला आणि फोफावला तो मंगेश पाडगावकर यांच्या कवितेत. कवितेच्या तंत्रावर असलेली प्रचंड हुकमत आणि शब्दांची मंत्रमोहिनी यावर पाडगावकरांनी मराठी साहित्यिकांच्या किमान चार एक पिढय़ांना रिझवले आणि आपल्या कवितेच्या मागे यायला लावले. पाडगावकर वा बोरकर यांच्या आधी मराठीत प्रेमकविता नव्हती असे नाही. ती होतीच. पण ती त्या काळानुसार दबलेली होती. तो काळच दबून राहण्याचा. साहजिकच भावनेचा हुंकारही तसा दबलेलाच असे. ‘वारा फोफावला’ वा ‘गगनी उगवला सायंतारा’सारखी भावगीते त्या काळीही होतीच. बबनराव नावडीकर वा गजानन वाटवे त्या काळास रिझवीत असत. ती कविता वा भावगीते ही ना. सी. फडके यांच्या कथानायकासारखी असत. टिपटाप, पोशाखी आणि सुखान्त अशी. त्यांत धीटपणा नव्हता. तो काही त्यांचा दोष अर्थातच नव्हे. तो काळाचा प्रभाव. हा काळबदल केला तो आधी बोरकर आणि नंतर पाडगावकर यांनी. हा बोरकरांचा प्रभाव पाडगावकरांच्या धारानृत्य या पहिल्या काव्यसंग्रहात ठसठशीतपणे दिसतो. परंतु पाडगावकरांचे वैशिष्टय़ हे की असा प्रभाव सतत राहिला तर तो आपल्या कवितेला काचेल हे त्यांना लक्षात आले आणि पाडगावकर ‘धारानृत्या’नंतर अलगदपणे बोरकरांच्या प्रभावातून बाहेर आले.
तो काळ मध्यमवर्गीयांच्या फोफावण्याचा. स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक उपक्रम, बँका, टपाल, रेल्वे आदी सेवांत वर्णी लावून जगण्याची सोय पाहण्यात या वर्गाच्या पहिल्या दोन पिढय़ा तरी खर्च पडल्या. त्यातून या वर्गास एक सांस्कृतिक स्थर्य आले. असे स्थर्य आल्याखेरीज संस्कृतीचा आनंद घेता येत नाही. पहिल्या पिढीचे हे स्थर्य विचक्षण नसते. ते आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांचे विभ्रम पाहण्यातच आनंद मानते. त्या घटनांतच त्यांना आनंद मिळवायचा असतो. त्यामुळे या घटनांचा अन्वयार्थ शोधण्याच्या फंदात या पिढय़ा पडल्या नाहीत. पाडगावकरांचा उदय नेमका या काळातला. सांस्कृतिक जाणिवांची आस लागलेला वर्ग उदयाला येत असतानाच अत्यंत सुलभ, गेय आणि नादमय अशी पाडगावकरांची कविता जन्मास येत होती. तिचे स्वागत झाले नसते तरच नवल. त्यामुळे जन्माला आल्यापासून पाडगावकर आणि मराठी रसिक यांचे एक अद्वैत तयार झाले. पाडगावकरांनीही या विश्वासास कधी तडा जाऊ दिला नाही. हे साहचर्य हेवा वाटावे असे होते. ते तसे झाले की एकमेकांना एकमेकांचा अंदाज येतो. तसा तो मराठी वाचक आणि पाडगावकर या एकमेकांना आला होता. मराठी वाचकांना काय हवे आहे याची अचूक जाण पाडगावकरांना होती आणि पाडगावकर आपणास काय, कसे आणि किती देणार आहेत याची जाणीव मराठी वाचकांना होती. याचा चांगल्या अर्थाने अचूक फायदा पाडगावकर यांनी उचलला. त्याचे उदाहरण म्हणजे मुक्तछंद. ज्यास छंदोमयी लिहिता येत नाही त्याने केलेला कवितेचा प्रयोग म्हणजे मुक्तछंद असा त्या काळी मध्यमवर्गीय वाचकांचा समज होता. ‘हे काही आपल्याला बुवा कळत नाही’, असे म्हणत त्या तशा कवितेस सर्रास कमी लेखले जात असे. परंतु पाडगावकरांनी आपल्या कवितेत मुक्तछंद आणला आणि इतके दिवस या छंदास नाके मुरडणारा तशी कविताही वाचू लागला. आणीबाणीच्या पाश्र्वभूमीवरील भावभावनांचा सोयीस्कर असा हुंकार त्यांच्या सलाम या मुक्तछंदी कवितेतून व्यक्त झाला आणि तोही मध्यमवर्गास तितकाच रुचला. हा मराठी वाचकांचा पाडगावकर यांच्यावरचा विश्वास होता. त्या विश्वासाच्या आधारे पाडगावकरांनी उदंड प्रयोग केले. अगदी लिज्जत पापडाच्या जाहिरातीसाठीदेखील पावसाळी कविता लिहिली. परंतु वाचकांना तीदेखील आवडली.
याचे कारण वर उल्लेखलेली पाडगावकरांची तंत्रावरची हुकमत. कवितेचे हे तंत्र पाडगावकरांनी पूर्णपणे आत्मसात केले होते. कसे सांगावयाचे ते ठाऊक आहे आणि काय सांगावयाचे त्याचा सातत्याने शोध सुरू आहे, अशी अवस्था आली की लेखन प्रक्रिया सुलभ होते. पाडगावकरांसाठी ती तशी होती. त्यामुळेच बालगीतांपासून ते कबीर, मीरेच्या काव्यानुवादापर्यंत पाडगावकर मुक्त संचार करू शकले. ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय’ असे खरे बालगीत पाडगावकर त्याचमुळे लिहू शकले आणि त्याच सहजतेने ‘शुक्रतारा मंदवारा, चांदणे पाण्यातुनी’ हेदेखील सहजतेने त्यांना सांगता आले. ही सहजता आणि सरलता हे पाडगावकर यांचे मोठे वैशिष्टय़. याच वैशिष्टय़ाने त्यांनी भावगीतांना उंचीवर नेऊन ठेवले. आधुनिक भावगीतातील काव्याची उंची वाढवण्याचे श्रेय त्याचमुळे शांताबाईंच्या बरोबरीने पाडगावकरांकडे जाते. त्यामुळे त्यांच्या कवितेचे गाणे झाले तरी त्यातील काव्य दुय्यम होत नाही. याचे किती तरी दाखले देता येतील. ‘श्रावणात घननिळा बरसला’ या खळेकाकांच्या थोर संगीताने अमीट झालेल्या गाण्यातील शेवटचे कडवे पाडगावकरांच्या कवितेचे मोठेपण नमूद करते.
‘पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा,
अशा प्रीतीचा नाद अनाहत, शब्दावाचून भाषा,
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा’
हे पाडगावकरांचे काव्य. ते वाचले की त्याचमुळे काव्यरसिकांना ‘जागून ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी..’ असे वाटून आनंद होतो. अशा काव्यानंदाची अनुभूती वाचकांनाही देता येण्यासाठी मुळात कवीचे काव्यावर आणि स्वत:वरही अमाप प्रेम असावयास हवे. पाडगावकरांचे ते होते. त्यांनी कवितेइतकेच स्वत:वरही प्रेम केले. त्यांच्या जगण्यातून ते दिसत असे. पाडगावकर झोकात राहत. सरस्वतीच्या अंगणातील पुजारी म्हणून त्यांनी कधी लक्ष्मीस अव्हेरले नाही. चोख मानधन घेत आणि तितकाच चोख काव्यानंद रसिकांना देत. काव्य मफलीनंतर रंगणाऱ्या खासगी मफलीत मद्य कोणते आहे, हे विचारण्यास अनमान करीत नसत. हे असले चांगले राहणे मराठी कवींना पाडगावकरांनी शिकवले. उगाच कवितेच्या प्रेमापोटी वगरे भाबडे शब्द वापरून कवींचा वापर करणाऱ्या आयोजकांना त्यांनी कधीही थारा दिला नाही. आपल्या कवितेचे मोल त्यांना चांगले ठाऊक होते आणि ते वाजवून घेण्यात त्यांना कधीही कमीपणा वाटत नसे. या अशा स्वच्छ व्यावसायिकतेमुळे पाडगावकर उत्सवप्रियांच्या गळ्यातील ताईत असत. िवदा, वसंत बापट आणि पाडगावकर या त्रयीने महाराष्ट्रभर केलेल्या काव्यजागराच्या आठवणीने त्याचमुळे आजही अनेकांना प्रसन्नतेचा अनुभव येतो.
परंतु पाडगावकर हे िवदांचे समकालीन होते तरी त्यांच्या कवितेची जातकुळी वेगळी होती. िवदांप्रमाणे वा कुसुमाग्रजांप्रमाणे ते जीवनाचे तत्त्वज्ञान मांडण्याच्या वा शोधण्याच्या वाटेवर गेले नाहीत. जीवन सुंदर आहे आणि ते जगले पाहिजे, हे ते आवर्जून सांगत राहिले. ती एका अर्थाने त्यांच्या कवितेची मर्यादा आहे. ती होती कारण ती पाडगावकरांच्या व्यक्तिमत्त्वाची मर्यादा होती, म्हणून. बोरकरांनी म्हणून ठेवल्याप्रमाणे ते आनंदयात्री होते. दोस्ताना जमवावा, हास्यविनोद आणि काव्यानंदात दोन घटका मजेत घालवाव्यात असा त्यांचा स्वभाव. त्यांचे मोठेपण हे की ते तसेच जगले. कोणताही आव आणला नाही. आपण जसे आणि जितके आहोत तसेच आणि तितकेच ते समोर येत राहिले. या येथील जगण्यावर त्यांचे अमाप प्रेम होते. त्यामुळे ‘इथल्या िपपळपानावरती अवघे विश्व तरावे..’ अशी त्यांची इच्छा होती. ‘लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती’, ही त्यांचीच कबुली. छंदबद्ध, मुक्तछंदीय कविता आणि शब्दावर्तनी बोलगाणी, बालगीते, भावगीते, अनुवाद, महाभारत, शेक्सपियरविषयक लेखन अशा काव्याच्या विविध क्षेत्रांत पाडगावकरांनी मुक्त संचार केला. कवितेची विविध रूपे त्यांच्यात सांधली गेली होती. त्याचमुळे त्यांच्या कवितेतील ‘.. त्याने सांधलेले असते एक आभाळ..’ ही ओळ त्यांना यथार्थ लागू पडते. हे आभाळ आता रिते झाले. त्यांच्या स्मृतीस ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.

shivaji adhalarao patil, amol kolhe
अमोल कोल्हेंचे ‘ते’ विधान बालिशपणा अन् अज्ञानातून; शिवाजी आढळरावांचा टोला
lakdi pool in Pune
VIDEO : पानिपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशव्यांनी तातडीने ‘लकडी पूल’ का बांधून घेतला? वाचा रंजक गोष्ट
Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”
udayanraje bhosale yashwantrao chavan marathi news
“यशवंतराव चव्हाणांनी संपूर्ण आयुष्य जनतेला समर्पित केले”, खासदार उदयनराजेंचे गौरवोद्गार