अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा राष्ट्रीय पातळीवर मंजूर करवून घेणे, हे भोंदूबाबांची यादी जाहीर करण्यापेक्षा दूरगामी आणि कायमस्वरूपी ठरेल..

अनैतिकांची म्हणूनदेखील एक नैतिकता असते. ती सहसा भंग होणार नाही, याची काळजी यातील प्रत्येक घटक घेत असतो. याचे अनेक दाखले देता येतील. एक शर्वलिक सहसा दुसऱ्या शर्वलिकाचे उद्योग उघडय़ावर येतील असे काही करीत नाही. किंवा वजनात मारणारा व्यापारी दुसरे तसेच काही करणाऱ्यास कधी बदनाम करण्याच्या फंदात पडत नाही. किंवा औषध कंपन्यांकडून लाच घेऊन रुग्णांच्या गळ्यात नको ती औषधे मारणारे किंवा उगाचच अँजिओप्लास्टी, आंत्रपुच्छ शस्त्रक्रिया, अनावश्यक शल्यकीय प्रसूती वगैरे करणारे दुसरे तसेच काही करणाऱ्यांच्या विरोधात बोलत नाहीत. एखादा राजकीय नेता निवडून येण्यासाठी वापरल्या गेलेल्या क्लृप्त्या दुसऱ्या राजकीय नेत्यास बदनाम करण्यासाठी वापरीत नाही. इतकेच काय राजकारण्यांच्या कच्छपि लागण्यात धन्यता मानणारे माध्यमवीर अन्य राजकारण्यांची तळी उचलण्यात धन्यता मानणाऱ्यांना कधी उघडे पाडत नाहीत. हे असेच सुरू असते आणि ते तसेच सुरू राहील यात व्यवस्थेचे हितसंबंध असतात. तेव्हा या पाश्र्वभूमीवर आखाडा परिषदेने देशातील १४ बाबाबापूबुवांची वर्गवारी भोंदू या सदरात करावी यास निश्चितच अर्थ आहे. तो शोधायला हवा. याचे कारण आखाडा परिषदेच्या या कृत्याने अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थेकडून मिळण्याची शक्यता नसली तरी त्या प्रश्नांना भिडणे आवश्यक ठरते.

Resident doctors, attacked,
दीड वर्षात निवासी डॉक्टरांवर नऊ वेळा हल्ले, सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यासाठी ‘मार्ड’चे राज्य सरकारला पत्र
Mumbai Municipal Corporation, bmc Imposes Fines on Contractors, Fines on Contractors for Negligence in Drain Cleaning, bmc Fines on Contractors, Negligence in Drain Cleaning in Mumbai, Drainage Cleaning, marathi news, drainage cleaning news,
मुंबई : नाल्यातून गाळ काढण्याच्या कामात कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली

यातील पहिला प्रश्न म्हणजे या संदर्भात असे प्रामाणिक, भोंदू आदी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आखाडा परिषदेस नेमका दिला कोणी? म्हणजे देशातील कथित साधुसंतबाबांचे प्रमाणीकरण केले जावे असे काही फर्मान सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने काढले आहे काय आणि त्या आदेशाद्वारे तसे करण्याचा अधिकार या आखाडा परिषदेस दिला आहे काय? या खात्याचे मंत्री मा. प्रकाश जावडेकर यांनी या प्रश्नावर प्रकाश टाकण्यास हरकत नाही. या आखाडा परिषदेच्या यादीत आसाराम बापू, या आसारामाचा मुलगा नारायण साई, राधे माँ, निर्मलबाबा, सच्चिदानंद गिरी, ओमबाबा, इच्छाधारी भीमानंद, ओम नम: बाबा, खुशी मुनी, बृहस्पती गिरी, मलकान गिरी, राम रहीम, रामपाल अशा अनेकांचा समावेश आहे. ही यादी पाहिल्यावर सहज लक्षात येणारी बाब म्हणजे यातील अनेकांवर याआधीच गुन्हे दाखल झालेले आहेत आणि यातील काही तुरुंगातही आहेत. तेव्हा उशिराने का असेना कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर मग यांना भोंदू म्हणण्याचे शौर्यकृत्य या आखाडा परिषदेने केले आहे. हिंदी चित्रपटात पोलिसांनी गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्याची खात्री झाल्यावर एखादा शूरवीर त्या गुन्हेगारास टप्पल मारण्याचे धर्य दाखवतो, तसेच हे आखाडा परिषदेचे कृत्य नव्हे काय? या आसारामाच्या चरणावर एके काळी गुजरातमधील अत्यंत समर्थ राजकारणी डोके टेकीत होता, तेव्हा त्यास भोंदू म्हणून जाहीर करण्याचे धर्य या आखाडा परिषदेमध्ये का नव्हते? स्वत:च्या निवासकक्षापासून गुप्त भुयाराने साध्वीनिवासापर्यंत संधान साधणाऱ्या राम रहीम अशा डबलबॅरल फिल्मी संताच्या आशीर्वादासाठी देशातील सर्वोच्च सत्ताधीश रांगा लावीत होते, तेव्हा ही आखाडा परिषद समाधिस्थ होती काय? आताही जे शरणागत आहेत वा गुन्हेगार म्हणून बदनाम झालेले आहेत त्यांनाच भोंदू ठरवण्याखेरीज त्यांच्या कृपाप्रसादासाठी सरकारी खर्च, वेळ ज्यांनी वाया घालवला त्यांचा धिक्कार करण्याचे धर्यदेखील ही आखाडा परिषद दाखवणार का? आपल्या देशात कररचनेतील निवडक बदल पूर्वलक्ष्यी प्रभावाने करण्याचा थोरपणा गेल्या काँग्रेस सरकारने दाखवला. या सरकारनेही तेच पाप पुढे चालू ठेवले. अशा परिस्थितीत या साधुसंतांना भोंदू ठरवण्याचा निर्णय हा पूर्वलक्ष्यी प्रभावाने अमलात येणार काय? देशाच्या संरक्षणमंत्रिपदावर बसणारी व्यक्ती पदाची सूत्रे हाती घेण्याआधी पूजाअर्चा, होमहवन आदी उद्योग करते ते कृत्यदेखील भोंदूगिरीच्या व्याख्येत बसू शकते असे म्हणण्याचा प्रामाणिकपणा या आखाडा परिषदेकडे आहे काय? हे झाले भूतकाळाबाबत. परंतु त्याच वेळी भगवी वस्त्रे परिधान करून, आपण म्हणजे आयुर्वेदातील कथित सात्त्विकतेचे प्रतीक आहोत असे भासवून वाटेल ती अप्रमाणित उत्पादने बिनविचारी ग्राहकांच्या गळ्यात मारणाऱ्यांचे मूल्यमापन ही आखाडा परिषद करणार आहे का? किंवा सध्या सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला राहून आपले बरेच काही बरे करून घेणारे अनेक बाबा वा बापू हे भावी भोंदू असू शकतात, असा काही धोक्याचा इशारा देण्याची व्यवस्था ही आखाडा परिषद कशी तयार करणार? मुळात भविष्यात असे नवनवे भोंदू तयार होऊ नयेत यासाठी काही करायला हवे असे आखाडा परिषदेला वाटते का? की सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या आसपासचे साधुसंत, बाबाबापू तेवढे खरे आणि त्या सत्ताधीशांपासून फारकत घेतलेले वा सत्ताधाऱ्यांनी प्रसंगोपात्त दूर लोटलेले मात्र भोंदू अशी ही मांडणी आहे? आणि याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखादा भोंदू आहे असे एखाद्यास आढळल्यानंतर त्या निष्कर्षांची परिणती ही व्यवस्थेकडून व्हायला हवी. म्हणजे या भोंदूंविरोधात कारवाई आदी करण्याची प्रक्रिया पोलीस वगैरे सरकारी यंत्रणेकडून व्हायला हवी. तसे काही करण्याचा विचार आखाडा परिषद करणार आहे किंवा काय? की तसे काहीच करायचे नाही, शासनमान्य यंत्रणांना दूर ठेवायचे आणि स्वत: एक समांतर व्यवस्था म्हणून उभे राहायचे असा आखाडा परिषदेचा मानस आहे? तसे असेल तर ते आणखीनच धोकादायक. आजारापेक्षाही हा उपचार भयानक अशी ही स्थिती. कारण व्यवस्थेमार्फतच या भोंदूबाबांचा नि:पात होणार नसेल तर उद्या या आखाडा परिषदेची दुकानदारी सुरू होणार नाही यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल. म्हणजे उद्याचे बाबाबापू आदी ‘आखाडा परिषद मान्य’ असे बिरुद मिरवणारच नाहीत, याची हमी काय? तसे झाल्यास आपण भोंदू ठरवले जाऊ नये म्हणून या आखाडा परिषदेच्या आश्रयास जाणे श्रेयस्कर असा सोयीचा विचार हे आजचे तनधनलोभस्नेही बाबाबापू करणारच नाहीत असे नाही. आखाडा परिषद हे विश्व हिंदू परिषदेचे उपांग आहे. त्यामुळे या परिषदेने हिंदू धर्मातील भोंदूंनाच हात घातला. पण मग अन्य धर्मातील अशांचे काय?

आणि या सगळ्या बरोबरीने एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धर्माच्या क्षेत्रातील ही भोंदूगिरी थांबावी यासाठी महाराष्ट्रासारख्या राज्यात एका कायद्याचा घाट घातला गेला. बरीच भवती न भवती झाल्यानंतर, जमेल तितका अडथळा आणला गेल्यानंतर हा कायदा कसाबसा मंजूर झाला. वस्तू आणि सेवा कराच्या मूळ मसुद्यात ज्याप्रमाणे ‘जनहितार्थ’ अनेक बदल केले गेले, त्यातील तरतुदी पातळ केल्या गेल्या त्याप्रमाणे या जादूटोणाविरोधी कायद्याचेही झाले. तरीही त्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे होते असे नाही. तेव्हा भोंदूपणाबाबत या आखाडा परिषदेस इतकीच जर काळजी असेल तर अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा हा राष्ट्रीय पातळीवर सर्वधर्मीयांसाठी अमलात आणला जावा असा आग्रह आखाडा परिषदेने धरावा. त्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे सहकार्यदेखील घ्यावे. तसे करणे हे अशी एखाददुसरी भोंदूबाबांची यादी जाहीर करण्यापेक्षा दूरगामी आणि कायमस्वरूपी काम ठरेल. या आणि अशा भोंदूंची पदास रोखणे ही खरी ईश्वरसेवा आहे. तेव्हा आखाडय़ा- आखाडय़ांतील मानपान, रुसवेफुगवे वगरेंनाही या संघटनेने मूठमाती द्यावी. नपेक्षा,

ऐसे कैसे झाले भोंदु। कर्म करोनि म्हणती साधु॥

अंगा लावुनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप॥

दावुनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा॥

तुका म्हणे सांगो किती। जळो तयांची संगती॥

हे तुकारामवचन सुमारे ४०० वर्षांनंतरही तितकेच सुसंगत आहे, असेच म्हणावे लागेल.