चित्रपटांसाठी ‘पोशाख-संकल्पन’ या क्षेत्राची भारतातील पायाभरणी करताना भानु अथय्यांनी, भारतीयता आणि भारतीय आधुनिकता यांचे भान लोकांपर्यंत पोहोचवले..

केवळ इतिहासपटांत न रमता, आजच्याच काळात घडणाऱ्या चित्रपटांसाठी उद्याच्या जनप्रिय फॅशनला चालना देणारे पोशाखही भानु अथय्यांनी घडवले..

Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
Nagpur dance bar, dance bar customers ,
नागपूर : डान्सबारमध्ये आंबटशौकीन ग्राहकांसमोर अश्लील नृत्य; मुंबई-दिल्लीच्या वारांगना…
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
ankita prabhu walavalkar Pushpa 2 review
“प्लीज, तुमचे पैसा वाया घालवू नका”, कोकण हार्टेड गर्लचे ‘पुष्पा 2’ बद्दल स्पष्ट मत; म्हणाली, “जे चित्रपट…”

मोठा कलावंत जातो तेव्हा, त्याने आपल्यासाठी नेमके काय केले हे समाजाला लगोलग सांगता येत नाही. माणसांच्या सौंदर्यासक्तीला योग्य वळण देऊन, समाजाला आणखी उत्साही किंवा आणखी प्रबुद्ध करणारे काम अशा अनेक ज्येष्ठ कलावंतांनी केलेलेच असते. ते कसे, हे बहुतेकदा खुद्द कलावंतालाही सांगता येत नाही. कालांतराने, कलेतिहासाच्या दृष्टीने शोध घेतला तर अमक्या कलावंताचे देणे नेमक्या कोणत्या नक्षत्रांचे होते, हे समजू शकणार असते.. पण बऱ्याचदा, साहित्याखेरीज अन्य- म्हणजे दृश्यकला, नृत्य, गायन अशा कलांमध्ये काम करणाऱ्या कलावंतांनी काय दिले, हे कळेस्तोवर उशीर झालेला असतो आणि काळ पुढे गेलेला असतो. तोवर त्या पुढे जाणाऱ्या काळाची नाडी ओळखणारे आणखी काही कलावंत उदयास आलेले असतात. कलेतिहासकार त्यांचे काम करीत असले, तरी ते पुस्तकातच राहाते. हे असे चक्र सुरूच राहिल्याने मग समाज एक युक्ती शोधतो. कलावंताच्या मोठेपणाबद्दल काही ठोकताळे बांधून ठेवायचे. त्यात बसणारे कलावंतच मोठे मानायचे- उदाहरणार्थ पुरस्कार मिळवलेले, सातत्याने काही दशके काम करणारे, ज्यांच्या कलाकृती गाजल्या असे कलावंत मोठे.. हे ठोकताळे योग्य आणि रास्तच. पण कलावंताचे खरे मोठेपण तेवढय़ाने मोजता येते का? भानु अथय्या यांनी वेशभूषा या कलेला भारतात आकार दिला. ‘ऑस्करविजेत्या पहिल्या भारतीय : १९८२ : गांधी’ ही त्यांची अद्वितीयता सर्वाना होती आणि आहे. शिवाय त्या कोल्हापूरच्या हे मराठीजनांना अभिमानास्पद वाटणारे. सन १९५६ पासून २०१५ पर्यंत, म्हणजे सहा दशके त्या चित्रपटांसाठी वेशभूषा करीत होत्या. हे सातत्यही महान म्हणावे असेच. पण हे सारे तपशील, ठोकताळ्यांबरहुकूम त्यांना मोठे ठरवण्यासाठी पुरेसे. त्याहीपलीकडे कलावंत म्हणून त्या कशा होत्या? याच्या उत्तरासाठी आणखी काही तपशिलांकडेच जावे लागेल, हे मान्य. पण त्या तपशिलांची वीण नेमकी कशी, हेही पाहावे लागेल.

कोल्हापुरात, गणपतराव ऊर्फ अण्णासाहेब राजोपाध्ये यांना चित्रकलेची आणि पुढे चित्रपटांचीही आवड होती हा एक तपशील. त्यांच्या सहा कन्यांपैकी एक म्हणून जन्मलेल्या भानुमती यांनीही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकले, नवव्या वर्षीच कलाकौशल्याचे उत्तम दर्शन घडवले आणि त्याच कौशल्याच्या आधारे मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्टमधील त्यांचे स्थान पक्के झाले, हा दुसरा तपशील. ‘जेजे’मध्ये जगन्नाथ अहिवासींच्या वर्गात शिकणाऱ्या या भानुमती राजोपाध्येंना सुवर्णपदक आणि त्यासोबत येणारी फेलोशिपही मिळाली होती हा तिसरा, आणि त्याच काळात ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप’च्या चर्चानाही अन्य विद्यार्थ्यांसह भानु यांचे येणेजाणे असे हा चौथा तपशील.. ‘भारतीय शैली’ शिकवणाऱ्या याच अहिवासींच्या वर्गातून पुढे थेट पॉल क्लीच्या स्वसंवेद्य आधुनिकतेकडे आणि नंतर अमूर्त चित्रांकडे वळलेले वासुदेव (व्हीएस) गायतोंडे हे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्टांइतकाच प्रभाव भानु यांच्यावर पाडणारे सहप्रवासी.. असे अनेक तपशील आहेत. त्यांच्याशी भानु अथय्यांच्या कीर्तीचा काही संबंध नाही, असेच प्रथमदर्शनी वाटेल. प्रोग्रेसिव्हांपैकी के. एच. आरा हे तर, चित्रपटक्षेत्रात गेल्याबद्दल तरुण भानुवर रागावलेही होते म्हणतात.

पण स्वातंत्र्योत्तर काळाच्या सुरुवातीला, स्वत:च्याही उमेदवारीच्या काळात भानु राजोपाध्ये यांनी ‘ईव्ह्ज वीकली’मध्ये फॅशन रेखाटने काढण्याचे काम करता-करता ‘भारतीय स्त्री’चा अभ्यास केला होता. ‘पुढे, ‘मी फॅशन डिझायनर नाही, मी करते ते ‘कॉस्च्यूम डिझाइन’- ते फॅशनपेक्षा निराळे’’- असे त्या अनेक मुलाखतींमध्ये ठासून सांगत. पण अनेक वर्षे अशी गत होती की, जनप्रिय फॅशनचे भारतीय क्षितिज म्हणजे हिंदी सिनेमे! ‘ईव्ह्ज वीकली’त त्यांनी केलेले एका ब्लाऊजचे रेखाटन लगेच

‘श्री -४२०’ मधल्या नर्गिसचा बंद गळा आणि कोपरापर्यंत हातांचा ब्लाऊज म्हणून दिसले. त्यानंतर भानु यांना वेशभूषा करण्याची रीतसर विनंती चित्रपटक्षेत्रातून झाली. ‘सीआयडी’मध्ये भारतीय पात्रांचे पाश्चात्त्य पोशाख, ‘चौहदवी का चाँद’मध्ये मुस्लीम तर ‘साहिब बीवी और गुलाम’मध्ये बंगाली वळणाचे पोशाख त्यांनी संकल्पित केले. आज ‘आम्रपाली ड्रेस’ म्हणूनच परिचित असलेला, १९६६ सालच्या ‘आम्रपाली’ चित्रपटातील वैजयंतीमालाचा वेश भानु यांचाच. त्याआधीच्या ‘संगम’ मधील ‘मैं का करूं राम मुझे बुढ्ढा मिल गया’ या गाण्यात वैजयंतीमाला क्षणात आडोशाला जाऊन कल्पकपणे चारदा वेश बदलून येते, ती कल्पकता अर्थातच भानु यांची. या गाण्याच्या सुरुवातीस दिसणारा पोशाख पोटावर मोठय़ा पट्टय़ाची गाठ असलेला टॉपवजा आहे; तो पुढे ‘बॉबी’तही दिसणे हा भानु यांचा अप्रत्यक्ष प्रभाव होता. ‘गाइड’मधल्या ‘पिया तोसे नैना लागे रे’ गाण्याच्या ‘रातको जब चाँद चमके’कडव्यात नर्तिकांच्या साडीचे काठ अंगावर चार ठिकाणी दिसतात. हे वेगळेपण पुढे ‘आजकल तेरेमेरे प्यार के चर्चे’ गाण्यावर साडी नेसून ट्विस्ट-शैलीत नाचणाऱ्या मुमताजच्या साडीमुळे अधिक खुलले. ‘लेकिन’मधल्या करडय़ा छटा, ‘चाँदनी’त पांढऱ्या कमीजवर श्रीदेवीने ल्यालेला रंगबिरंगी दुपट्टा यांचा तर शहरोशहरीच्या महिलांनी थेट स्वीकार केला. त्याहीआधी १९६५ सालच्या ‘आरजू’ आणि ‘वक्त’पासून स्लॅक्स (आजचे लेगिन) आणि बिनबाह्यंच्या तंग, पण गुडघ्यापर्यंतच्या टॉपची फॅशनच सुरू झाली, कारण साधना या अभिनेत्रीने त्या चित्रपटांत ते परिधान केले होते. अर्थात, ‘वक्त’मधली भानु अथय्यांची मेहनत ‘ऐ मेरी जोहराजबीं’ या कव्वालीच्या वेळी पोशाखांतून अधिक दिसते.

भारतीय संस्कृतीची पुरेपूर जाण, तरीही भरपूर अभ्यास करून मगच वेश ठरवणे, इतिहासाच्या कोणत्या टप्प्यावर काय पोशाख होते याचा पुरावा उपलब्ध नसल्यास कल्पनेची अचूक झेप, हे गुण ‘गांधी’च नव्हे तर कॉनरॅड रूक्स दिग्दर्शित ‘सिद्धार्थ’, पुढे ‘रझिया सुलतान’, जब्बार पटेलांचा ‘आंबेडकर’ आदी अनेक चित्रपटांत भानु यांनी दाखवून दिले. नचिकेत व जयू पटवर्धन किंवा आजच्या अनु वर्धन, तमन्ना भाटिया यांसारख्या वेशभूषाकारांना या अभ्यासू कल्पकतेची प्रेरणा त्यांनी दिली. आजच्याच काळात घडणाऱ्या चित्रपटांत कसले वेशभूषेचे महत्त्व, असे न मानता उद्याच्या जनप्रिय फॅशनला चालना देणारे पोशाख त्यांनी घडवले. इतिहासाचा अस्सलपणा आणि आजच्या आशाआकांक्षा यांचा मेळ या कामाकडे साकल्याने पाहताना दिसून येतो.

त्याहीपलीकडे, प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपला भारतीयता आणि आधुनिकता यांचे नाते जसे हवे होते, तसेच ते भानु राजोपाध्ये-अथय्यांनी अंतर्यामी जपले, हे वेशभूषा क्षेत्रातील त्यांच्या एकंदर कामातून दिसते. आधुनिकता हे मानवी प्रयत्नांच्या इतिहासवृक्षाचे फळ आहे, ते केवळ पाश्चात्त्य असूच शकत नाही आणि भारतीय इतिहास तसेच वास्तव यांना भिडणारे भारतातील कलावंत जगालासुद्धा आपलेच मानणार, अशी भावना जोपासणाऱ्या या चित्रकार-गटाचा एफ एन सूझा यांनी १९४८ सालात लिहिलेला जाहीरनामा ‘कला आणि लोक यांतील अंतर मिटवणे’ असे ठोस ध्येयच जाहीर करतो.

ते अंतर भानु अथय्यांनी खरोखरच मिटवले. ‘मी फॅशन डिझायनर नाही’ असे ठणकावणाऱ्या भानु यांनी त्यांच्या ‘कॉस्च्यूम डिझाइन’मधून फॅशन डिझायनरांसह लोकांनाही भारतीयता आणि भारतीय आधुनिकता यांचे भान दिले. त्यांची ऑस्करची बाहुली भले त्यांनी ‘या देशात ती जपली जाईल असे वाटत नाही’ म्हणून त्या अमेरिकी अकादमीला परत केली असेल; पण भानु अथय्यांनी मुख्य धारेतील चित्रपटांसारख्या जनमाध्यमातून हे जे भान देऊ केले, ते जपणे तर आपल्याच हाती आहे. ‘पोशाख-संकल्पन’ या क्षेत्राची पायाभरणी करताना ‘प्रोग्रेसिव्ह’ चित्रकारांच्या ऊर्मी जपणाऱ्या भानु अथय्यांना ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.

Story img Loader