प. बंगालात बालमृत्यू झाले तेव्हा ममतांच्या राजीनाम्याची मागणी करणारे भाजप नेते गोरखपूरमधील बालमृत्यूंबाबत मात्र शांत बसतात..
आजपासून सहा वर्षांपूर्वी, २०११ सालच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात कोलकाता येथील बी. सी. रॉय बाल रुग्णालयात पंधरवडय़ात जवळपास ५० अर्भके दगावली. यातील डझनभर बालकांचे मृत्यू केवळ डेटॉलच्या ऐवजी काबरेलिक अॅसिडसारखे रसायन वापरण्याचा बेजबाबदारपणा रुग्णालयाने दाखवला म्हणून झाले. या रुग्णालयात त्या वेळी ३६० बालकांना सामावून घेण्याची क्षमता होती. त्या काळात दिवसाला ५० अशा गतीने नवनवे रुग्ण तेथे येत इतका रुग्ण बालकांचा आवेग होता. येतानाच ही बालके इतक्या क्षीण अवस्थेत येत की त्यांना मरणाशिवाय पर्यायच राहत नसे, असा युक्तिवाद त्या वेळी या रुग्णालयाच्या वतीने केला गेला. काही प्रमाणात ते खरेही होते. तरीही ते समर्थनीय होते असे म्हणताच येणार नाही. त्या वेळी विरोधकांनी हाच मुद्दा उचलून धरला आणि या निर्घृण अनास्थेबद्दल प्रशासनावर सडकून टीका केली. त्या वेळी या प्रशासनाच्या प्रमुख होत्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. त्या वेळी केंद्रात आणि अर्थातच प. बंगालात सत्तेबाहेर असलेल्या भाजपने बॅनर्जी यांना लक्ष्य केले. भाजपचे त्या वेळी आणि आताही प. बंगालात मोठे स्थान नाही. तेव्हा हे बालमृत्यू ही हे स्थान निर्माण करण्याची संधी आहे, असा सोयीस्कर.. आणि रास्त राजकीय.. हिशेब करीत भाजपने ममता बॅनर्जी यांच्यावर टीकेची झोड उठवली. ममता यांना पायउतार होण्याखेरीज पर्याय कसा नाही आणि या मृत्यूची जबाबदारी त्यांनीच कशी घ्यायला हवी हे भाजप नेते आपल्या माध्यमस्नेही चातुर्याने चॅनेलीय चर्चेत अहमहमिकेने सांगत.
या सहा वर्षांपूर्वीच्या बालमृत्यूंचे श्राद्ध आता नव्याने करण्याचे कारण म्हणजे उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे झालेले रुग्णालयीन बालमृत्यू. हे रुग्णालय गोरखपूर येथे आहे. गोरखपूर हा मुख्यमंत्री अजय सिंग ऊर्फ योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ. याच मतदारसंघात त्यांची हिंदू सेना नावाची संघटना आहे आणि ते सत्ताधारी झाल्यावर दिवसाला पाच हजार वा अधिक संख्येने त्यांची सदस्यसंख्या वाढत होती. याच गोरखपुरात या योगी यांचा मठदेखील आहे आणि तेथे आपण समाजसेवा करतो असा त्यांचा दावा आहे. या समाजसेवेच्याच बळावर त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद हिसकावून घेतले. ताज्या विधानसभा निवडणुकांनंतर मुख्यमंत्र्यांची निवड करण्याच्या वेळी या योगींच्या समाजसेवी स्वयंसेवकांनी इतका गदारोळ केला की भाजपच्या श्रेष्ठींना मुख्यमंत्रिपदी त्यांची निवड करावीच लागली. ती केली नसती तर दंगल उसळली असती इतका योगिक दबाव आदित्यनाथांच्या समर्थकांनी त्या वेळी आणला. हा अगदी ताजा इतिहास. या मतदारसंघावर या योगींची इतकी पकड आहे की आपण आपल्या मतदारसंघास तळहातावरच्या रेषांइतके ओळखतो, असे हे योगी जाहीरपणे म्हणत. परंतु त्यांची ही ओळख वास्तव की योगिक असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती तेथे उद्भवलेली दिसते. याचे कारण गेल्या पंधरवडय़ात तेथे उद्भवलेले मृत्यू. दिवसाला १२ अशा भयावह गतीने गोरखपुरातील रुग्णालयात ही नवजात अर्भके मरत गेली. या रुग्णालयाची परिस्थिती हलाखीची आहे, असे इशारे गेल्या तीन-चार महिन्यांत सहा-सात वेळा संबंधित यंत्रणांनी सरकारला दिले होते, असे उघड झाले आहे. परंतु त्याकडे या योगींनी दुर्लक्ष तरी केले असावे अथवा आपल्या योगिक सामर्थ्यांने आपण या आव्हानांचा नि:पात करू असे तरी त्यांनी मानले असावे. असे म्हणता येते याचे कारण या रुग्णालयास प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराने पुरवठा थांबवण्याचा जाहीर इशारा दिला होता. अखेर त्याने तो थांबवला आणि प्राणवायूअभावी ही बालके आपल्या जन्मदात्यांसमोर तडफडून प्राण सोडत राहिली. योगी त्यांना वाचवू शकले नाहीत.
आता सरकारी यंत्रणेचा सर्व संताप त्या प्राणवायू पुरवठादारावर निघेल, अशी चिन्हे दिसतात. परंतु तपशिलात पाहू गेल्यास त्या कंत्राटदारास दोष देता येणार नाही. याचे कारण रुग्णांसाठी जरी प्राणवायू महत्त्वाचा असला तरी त्याचा उत्पादन खर्च वसूल होणे कंत्राटदारासाठीदेखील महत्त्वाचेच होते. या कंत्राटदाराचे गेल्या सहा महिन्यांपासूनचे देणे या रुग्णालयाने दिलेले नाही. ही रक्कम ७० लाख रुपयांच्या घरात जाते. हे वास्तव खुद्द योगी मुख्यमंत्र्यांसमोरदेखील मांडले गेले. कोणताही कंत्राटदार.. भले तो प्राणवायूचा का असेना.. पैसेच येत नसतील तर आपले उत्पादन पुरवत राहणार नाही. यातील सरकारच्या वतीने निर्लज्ज बाब म्हणजे कोणत्याही कारणास्तव पैसे चुकते करण्यास विलंब झाला तरी ही रक्कम १० लाख रुपयांच्या वर जाऊ दिली जाणार नाही, असे कलम रुग्णालय आणि कंत्राटदार यांच्यातील करारात आहे. प्रत्यक्षात यापेक्षा सात पटींनी या कंत्राटदाराचे देणे दिले गेले नाही. वारंवार तगादा लावूनही आपले पैसे मिळत नाहीत हे लक्षात आल्यावर त्याने गेल्या महिन्यात अंतिम इशारा दिला आणि आपण प्राणवायूचा पुरवठा थांबवू, त्याचे परिणाम गंभीर होतील असे प्रशासनास बजावले. तरीही मुख्यमंत्र्यांच्या योगिक मतदारसंघातील प्रशासनावर त्याचा काडीचाही परिणाम झाला नाही. अखेर त्याने प्राणवायूचा पुरवठा थांबवला आणि बालके त्याअभावी प्राण सोडत गेली. यात अत्यंत आक्षेपार्ह बाब म्हणजे दोनच दिवसांपूर्वी खुद्द योगी आदित्यनाथ यांनी जातीने या रुग्णालयास भेट दिली. त्या वेळी चाळीस वा अधिक बालकांचे मृत्यू झाले होते आणि परिस्थिती किती गंभीर आहे हे त्यांच्यासमोर आणले गेले होते. तरीही काहीही झाले नाही. आपल्या कथित पुण्यसंचयावर बहुधा या योग्यांस अधिक विश्वास असावा. किंवा आपण ज्याप्रमाणे प्राणायाम करून श्वसन रोखू शकतो तसे या बालकांनाही करता येत असावे, असे त्यांना वाटले असावे. कारणे काहीही असोत. परंतु घडले ते हे असे. योगींनी दर्शन दिल्यानंतरच्या दोन दिवसांत या रुग्णालयात आणखी वीस बालके दगावली. मृतांची संख्या ६० झाल्यावर कुठे या सरकारला जाग आली आणि संबंधित नोकरशहांवर कारवाई झाली. आता या साऱ्याची चौकशी केली जाईल आणि दोषींना सोडले जाणार नाही अशा वल्गना हे योगी आणि त्यांचा भाजप करत राहतील.
तेव्हा मुद्दा असा की ५० बालकांच्या निधनावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा राजीनामा मागणाऱ्या भाजपने ६० बालकांच्या मृत्यूंसाठी आपल्याच मुख्यमंत्र्याचा राजीनामा का घेऊ नये? स्वच्छतेची सुरुवात स्वत:पासून होते असे म्हणतात. आणि सध्या तर देशात स्वच्छता अभियानच सुरू आहे. तेव्हा ही प्रशासकीय स्वच्छता सुरुवात आपल्याच पक्षापासून करण्याची हिंमत भाजपाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार का? ही अश्राप पोरे आईवडिलांच्या देखत मरत असताना आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केले. त्याचा नक्की अर्थ काय? पंतप्रधान लक्ष ठेवून होते म्हणजे काय? त्यामुळे काही मृत्यू टळले काय? नसतील तर त्या लक्ष ठेवण्याचा अर्थ काय? इतके मृत्यू अन्य पक्षीय राजवटीत झाले असते तर या पंतप्रधान आणि पक्षाध्यक्षांनी काय केले असते?
यातील एका प्रश्नाचेही उत्तर एकही भाजप नेता देणार नाही. त्यापेक्षा हे सारे नोकरशहांमुळेच कसे घडले हे दाखवून देण्यातच हे सर्व धन्यता मानतील. याचे कारण हे असे करणे सोपे आहे आणि हे असेच आधीची काँग्रेसे वा अन्य सरकारे करीत आली आहेत. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कायम शुभ्र साडी परिधान करतात, काँग्रेसचे मुख्यमंत्री पांढऱ्याशुभ्र खादीत असतात, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री भगव्या कफनीत. हे झाले बाह्य़ स्वरूप. बाकी या सर्वात गुणात्मक फरक काय? तसा तो काहीही नाही. उत्तर प्रदेश मुख्यमंत्र्यांच्या नाकाखाली घडलेले हे योगिक बालकांड हेच दाखवून देते. हा फरक पुसला जातो त्यामागे एकमेव कारण असते: सत्ता गृहीत धरणे. तेव्हा कोणत्याही राजकीय पक्षास सत्ता गृहीत धरता येणार नाही, अशी व्यवस्था मतदारांनाच करावी लागते. राजकीय बेमुर्वतखोरीस तेच उत्तर आहे.