अटलबिहारी वाजपेयी हे जसे कर्मठ संघीय नव्हते तसेच जॉर्ज फर्नाडिस हे आंधळे समाजवादी नव्हते..
आयुष्यभर दहा ते पाच नोकरी करून सुरक्षित आयुष्य जगणाऱ्या पापभीरूंना बंडखोरांचे नेहमीच आकर्षण असते. जागतिक पातळीवर असा सर्वाना आकर्षून घेणारा बंडखोर म्हणजे चे गव्हेरा. भारतात तो मान निर्वविाद जॉर्ज फर्नाडिस यांचा. तसे पाहू गेल्यास कागदोपत्री जॉर्ज यांची ओळख एक कामगार नेता इतकीच. पण ते तितके कधीच नव्हते. किंबहुना कोणा एकाच ओळखीत मावणे हा जॉर्ज यांचा स्वभावच नव्हता. मूळचे मंगलोरी ख्रिश्चन, निवडणूक लढवली मुंबई आणि बिहारातून, कार्यस्थल मुंबई आणि समस्त भारत, या प्रवासात संवाद साधला तुळू, मंगलोरी कोंकणी, मराठी, हिंदी आणि अस्खलित इंग्रजीतून आणि कोणाशी? तर जेआरडी टाटा ते रस्त्यावरचा मुंबई महापालिकेचा सफाई कामगार ते संपादक ते लेखक/ कवी अशा अनेकांशी. अशा सर्वव्यापी, सर्वसंचारी व्यक्तिमत्त्वांची पदास अलीकडच्या काळात थांबलेली आहे. त्यामुळे माणसे अशीही असू असतात यावर गेल्या दीड-दोन दशकांचे राजकारण अनुभवणाऱ्या पिढीचा विश्वास बसणे अंमळ अवघड. म्हणून जॉर्ज फर्नाडिस यांचे मोठेपण समजून सांगणे ही काळाची गरज ठरते.
काळाची गरज हा शब्दप्रयोग येथे उचित ठरतो. कारण जॉर्ज फर्नाडिस यांचे मोठेपण काळास आपल्या गरजेप्रमाणे वाकवण्यात होते. राजकीय विचारधारा म्हणावी तर ते कडवे राम मनोहर लोहियावादी. त्यांचा पूर्ण प्रभाव फर्नाडिस यांच्यावर आयुष्यभर राहिला. समाजवादी असूनही भारतीय मानसिकतेवरचा राम आणि कृष्ण यांचा प्रभाव नोंदवण्यात लोहिया यांना कधी कमीपणा वाटला नाही. या दोघांच्या सांस्कृतिक प्रभावाविषयी केवळ लिहिले म्हणून आपल्याला हिंदुत्ववादी ठरवले जाईल अशी भीती नसणारा तो काळ. त्या काळास लोहिया यांच्यासारख्यांनी सुसंस्कृत आकार दिला आणि त्यात बॅ. नाथ प, मधु लिमये, मधु दंडवते, फर्नाडिस यांच्यासारख्यांचे वैचारिक पालनपोषण झाले. देशास स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत जॉर्ज मुंबईत आले आणि मुंबईकरच झाले. महानगरपालिका कामगारांची संघटना उभारण्याचे श्रेय त्यांचेच. त्या वेळच्या मुंबईवर नामदार स का पाटील यांची कडवी पकड होती. ते काँग्रेसचे आणि केवळ मुंबईचाच नव्हे तर साऱ्या देशाचा राजकीय पसच काँग्रेसने व्यापलेला. अशा वातावरणात जॉर्ज यांनी कामगार चळवळीच्या माध्यमातून आपला राजकीय सारिपाट मांडला आणि पहिल्याछूट थेट स. का. पाटील यांच्यासारखा मोहरा त्यांनी टिपला. पहिलेच यश इतके घवघवीत मिळाल्याने जॉर्ज यांचा पुढचा राजकीय प्रवास सुरळीत सुरू झाला. जायंट किलर या उपाधीने त्यांच्याभोवती आपोआपच एक वलय तयार झाले.
जॉर्ज यांनी ते मोठय़ा तोऱ्यात मिरवले. त्यात भारतीय मानसिकतेत विनम्रतेस एक उगाचच महत्त्व आहे. मग ती खरी असो अथवा बेगडी. आणि त्यात हा विनम्र कथानायक साधा म्हणता येईल असा असेल तर पाहायलाच नको. त्याचे पाहता पाहता दंतकथेत रूपांतर होते. जॉर्ज यांचे तसे झाले. खादीचाच कुडता आणि पांढरा पायजमा आणि कंगव्याचा स्पर्शच झालेला नाही, असे वाटावे असे केस. हे त्यांचे दिसणे अनेकांना मोहित करणारे असे. आपण कोणताही बडेजाव मिरवत नाही ही भावना मिरवण्यात एक सुप्त बडेजाव असतो आणि तो मिरवणाऱ्याच्या बडेजावापेक्षा जास्त मोठा होतो. जॉर्ज फर्नाडिस यांना याची जाणीव होती. त्यामुळे तो साधेपणा त्यांनी कधीही सोडला नाही. अगदी मंत्रिपदी असतानाही स्वत:ची मोटार स्वत: चालवत जाण्यात एक प्रकारचे भाष्य असते. जॉर्ज सतत असे भाष्य करीत. वास्तविक या साधेपणाशी सांगड घालेल असे काही त्यांचे वैयक्तिक आयुष्य होते असे म्हणता येणार नाही. तेचि पुरुष दैवाचे.. असे म्हणता येईल इतक्या रसिकतेने ते जगले. गोवा, मुंबई ते दिल्ली या मोठय़ा प्रवासात त्यांच्या रसिकतेचे अनेक साक्षीदार आहेत. पण हे आयुष्यदेखील त्यांनी कधी लपवले नाही. मी आहे हा असा आहे, असे त्यांचे जगण्याचे तत्त्वज्ञान होते आणि ते कमालीचे लोभस होते. एरवी समाजवादी- किंवा दुसऱ्या बाजूचेही.. परंपरा शिरसावंद्य मानून जगणे बेतणारे समोरच्यास वात आणतात. रस्त्यावर विष्ठा दिसली रे दिसली की आता आपल्याला ती साफ करायला मिळणार या आनंदाने चीत्कारणाऱ्या समाजवाद्यांचे जयवंत दळवी यांनी यथासांग वर्णन करून ठेवले आहे. पण समाजवाद्यांच्या कळपातले असूनही जॉर्ज कधीही असे कंटाळवाणे नव्हते. जीवनावर आणि जीवनातील प्रत्येक उपभोगाच्या घटकावर त्यांचे मन:पूर्वक प्रेम होते. त्यामुळे ते कधीही जीवनाविन्मुख झाले नाहीत. त्यांचा सहवास आनंददायी आणि हवाहवासा असे. अद्वातद्वा बोलणारे कामगार पुढारी असोत वा वरकरणी मोजकेच बोलके भासणारे गोिवदराव तळवलकर असोत. जॉर्ज सगळ्यांशी सहज संवाद साधत. आणीबाणीच्या काळात भूमिगत असताना तर काही काळ ते तळवलकरांच्याकडे राहिले. एरवी समाजवाद्यांची यथेच्छ धुलाई करणाऱ्या गोिवदरावांनाही जॉर्ज यांच्याविषयी ममत्व होते. सहवासात आलेल्या प्रत्येकास जवळचे वाटायला लावणे हे जॉर्ज यांचे वैशिष्टय़.
हा रसरशीतपणा जसा त्यांनी लोहिया यांच्याकडून घेतला तसाच कमालीचा काँग्रेसविरोध हीदेखील त्यांना लोहियांकडून मिळालेली देणगी. समस्त लोहियावाद्यांनी आंधळेपणाने काँग्रेसविरोध जोपासला. त्यासाठी प्रसंगी दुसऱ्या टोकास जाऊन भाजपशीदेखील शय्यासोबत करण्यात या मंडळींना काही अयोग्य वाटले नाही. विश्वनाथ प्रताप सिंग यांच्यासारख्या अनेकांनी हा ढोंगीपणा केला. समाजवादी म्हणायचे, सांप्रदायिक तत्त्वांना विरोध करण्याची भाषा करायची आणि तरीही भाजपशी हातमिळवणी करायची असे त्या वेळी अनेकांनी केले. जॉर्ज यास अपवाद नाहीत. आणीबाणीनंतरच्या पहिल्या बिगरकाँग्रेसी सरकारात ते पहिल्यांदा त्या वेळच्या जनसंघीयांच्या मांडीस मांडी लावून बसले. आयबीएम आणि कोकाकोला कंपन्यांना भारतातून हाकलून लावण्याचा जॉर्ज फर्नाडिस यांचा अगोचरपणा त्याच काळातला. नंतरच्या काळात याच काँग्रेसविरोधाचा भाग म्हणून जॉर्ज यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची मोट बांधून ठेवण्याचे काम सातत्याने केले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारचे ते प्रामाणिक संकटमोचक. खरे तर दोघेही वैचारिकतेच्या दोन ध्रुवांवरचे. पण एकमेकांचे चांगले सुहृद म्हणता येईल इतके त्यांचे उत्तम संबंध होते. कदाचित हे दोघेही आपापल्या परिवारांत तसे नकोसेच होते. वाजपेयी कर्मठ संघीय नव्हते तर जॉर्ज आंधळे समाजवादी नव्हते. त्या अर्थी दोघेही समदु:खी. त्यामुळेही असेल दोघांचे समीकरण उत्तम जमले. त्या काळात वाजपेयी सरकारातील संरक्षणमंत्री म्हणून जॉर्ज फर्नाडिस यांची कारकीर्द किती तरी उजवी म्हणावी लागेल. दुर्गम हिमाच्छादित सियाचिन परिसरास संरक्षणमंत्री म्हणून सर्वाधिक भेटी देण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर असेल. तो काळ मिरवण्याचा नव्हता. त्यामुळे या भेटींसाठी स्वत:चीच छाती आणि पाठ थोपटून घेण्याचा अलीकडच्यासारखा माध्यमी उद्योग कधी त्यांनी केला नाही. १९९८ सालच्या पोखरण अणुचाचण्या आणि नंतरचे कारगिलचे युद्ध या दोन्ही वेळी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नाडिस होते, हे विसरता येणार नाही. विशेषत: पोखरण चाचण्यात अमेरिकेचा दबाव झुगारून लावण्यात पंतप्रधान वाजपेयी यांना मोलाची साथ फर्नाडिस यांची होती.
प्रत्येक समाजवाद्याच्या प्राक्तनात आपल्याच अनुयायाकडून लाथाडले जाणे लिहिलेले असते. जॉर्ज यांच्याही नशिबात ते होते. त्यांच्या एके काळच्या लाडक्या नितीशकुमार यांनीच पुढे जॉर्ज यांना राजकारणात पाचर मारली. बहुतेक समाजवाद्यांना त्याचे काही वाटत नाही. कारण त्यांनीही तेच केलेले असते. जॉर्ज यांचे खरे तर तसे नाही. पण तरीही नितीशकुमार आदींच्या दगाफटक्याने ते नाराज झाले नाहीत. पुढे पुढे तर एके काळचे लोहियावादी भलत्याच उद्योगाला लागले. लालूप्रसाद यादव, मुलायम सिंग वगैरे मंडळी एकापेक्षा एक गणंग निघाली. हे सगळेच जॉर्ज यांचे एके काळचे साथी. पण जॉर्ज या सगळ्यात वेगळे आणि मोठे होते. वैयक्तिक स्वार्थापेक्षा वेगळे असे वैचारिक अधिष्ठान त्यांच्या राजकारणास होते. त्याच्याविषयी मतभेद असू शकतात. पण घृणा निश्चितच असणार नाही. साहित्य, संगीत अशा सगळ्यात जॉर्ज यांना रस होता. त्यांच्या साधेपणात कधीही नीरसता नव्हती.
गेली दहा वर्षे ते अज्ञातवासात होते ते बरेच म्हणायचे. अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणे जॉर्ज यांनाही अखेरच्या काळात स्मृतिभ्रंशाने ग्रासले. दोघेही दीर्घायुषी. त्या शापावर विस्मरण हा त्यांचा उ:शाप होता. दोघेही रसिकतेने जगले आणि धकाधकीच्या राजकारणाची काळी सावली त्यांच्या रसिकतेवर पडली नाही. शेवटच्या टप्प्यात ते वर्तमानापासून तुटलेले राहिले ते बरेच झाले. वर्तमानाच्या एकसुरीपणास ते कंटाळले असते. आपल्या विचारधारेचा सन्मान म्हणजे समोरच्याच्या वैचारिकतेचा अपमान असे या दोघांनीही कधी मानले नाही. काही महिन्यांपूर्वी वाजपेयी गेले. आज जॉर्ज फर्नाडिस. आयुष्यभर रोमँटिक आणि रसरशीत राहिलेल्या या बंडखोरास ‘लोकसत्ता’ परिवाराची आदरांजली.